भावेश नकाते अपघात प्रकरणानंतर रेल्वेकडून आणि प्रशासनाकडून विविध उपाययोजना झाली आणि रेल्वे अपघातांतील मृतांचा आकडा लक्षणीयरीत्या खाली आला. मात्र, मंगळवारच्या दिवशी पुन्हा एकदा रेल्वेमार्गावर मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. लोहमार्ग पोलिसांच्या नोंदीप्रमाणे मुंबई उपनगरीय क्षेत्रात या एकाच दिवशी १७ जणांचे मृत्यू झाले. यात सर्वाधिक म्हणजे चार मृत्यू कल्याण रेल्वे पोलिसांच्या हद्दीत झाले असून सुदैवाने दादर, वाशी, पनवेल आणि पालघर या स्थानकांच्या हद्दीत एकही अपघाताची घटना घडली नाही.
भावेश नकातेच्या अपघाती मृत्यूनंतर रेल्वे मंत्रालयानेच रेल्वेमार्गावरील अपघात रोखण्यासाठी समितीची स्थापना केली होती. या समितीने त्यासाठी विविध उपाययोजनाही सुचवल्या होत्या. त्याशिवाय रेल्वे सुरक्षा दलाने अपघातासाठी संवेदनशील ठिकाणी आपल्या जवानांचा बंदोबस्तही ठेवला होता. परिणामी दर दिवशी किमान अपघाती मृत्यू होणाऱ्या उपनगरीय रेल्वेमार्गावरील मृत्यूंची संख्या दर दिवशी सरासरी सहा ते सात एवढी कमी करण्यात प्रशासनाला यश आले होते. त्यापकी काही दिवशी तर ही संख्या केवळ एक किंवा दोन एवढीच होती.
मात्र मंगळवारी १५ मार्च रोजी उपनगरीय रेल्वेमार्गावर तब्बल १७ प्रवाशांचे मृत्यू झाले. तसेच सहा प्रवासी जखमी झाले. उपनगरीय रेल्वेमार्गावर ठाणे ते कल्याण या टप्प्यात आणि पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरिवली या टप्प्यात अपघाती मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे. मंगळवारी ठाणे ते कल्याण या स्थानकांदरम्यानच्या ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत आठ मृत्यू झाले. त्यापकी चार हे कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत होते. तर ठाणे आणि डोंबिवली या हद्दीत प्रत्येकी दोन मृत्यू झाले. कल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जखमी झालेल्या प्रवाशांची संख्याही सर्वाधिक म्हणजे दोन एवढी आहे.
शनिवार ते सोमवार म्हणजे १२ ते १४ मार्च या तीन दिवशी रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची एकत्रित संख्या १५ एवढी आहे. त्यापकी सोमवारी पाच जणांचा मृत्यू झाला होता, रविवारी सात जणांनी लोहमार्गावर आपले जीव गमावले आणि शनिवारी तीन जण रेल्वे अपघातांत मृत्युमुखी पडले होते. मंगळवारी एकाच दिवशी १७ जणांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस पुन्हा एकदा अचंबित झाले आहेत. हे अपघात टाळण्यासाठी पुन्हा एकदा कठोर मोहीम राबवण्यात येईल, असे लोहमार्ग पोलिसांतर्फे सांगण्यात आले.