महामार्गावर  तात्काळ मदतीसाठी मृत्युंजय दूत

मुंबई: राज्यातील महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचावे यासाठी महामार्ग पोलिसांनी ‘मृत्युंजय दूत’ संकल्पना राबविली आहे. महामार्गालगतच्या गावातील ग्रामस्थ, पेट्रोल पंप व ढाब्यावर काम करणारे कर्मचारी, सामाजिक संस्था आदींचा समावेश असलेल्या या मृत्युंजय दूतांनी गेल्या अडीच महिन्यांत २५० अपघातग्रस्तांचे प्राण वाचविले आहेत.

एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यास रुग्णवाहिका येण्याची वाट न पाहता अपघातग्रस्तांना त्वरित प्रथमोपचार मिळावे आणि त्याबरोबरीने रुग्णालयातही दाखल करण्यासाठी प्रयत्न व्हावे, यासाठी महामार्ग पोलिसांनी महामार्गाजवळील गावकरी, पेट्रोल पंप, टोल नाके , ढाब्यावरील कर्मचारी, दुकानदार यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना मृत्युंजय दूत असे नाव देऊन ही संकल्पना १ मार्च २०२१ पासून राज्यात सुरु के ली.

ठाणे, रायगड, पुणे, नागपूर परिक्षेत्रात असलेल्या महामार्गालगतच ५ हजार १२ मृत्युंजय  दूत कार्यरत आहेत. १ मार्च ते १५ मे पर्यंत झालेल्या १५३ अपघातात २८६ जण जखमी झाले. त्यांना प्रथमोपचार करून रुग्णालयात दाखल करण्याचे काम या दूतांनी केले.  या कामगिरीमुळे २८६ पैकी २५० जणांचा जीव वाचला, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. पुणे परित्रक्षेत्रात सर्वाधिक ३ हजार ४८० मृत्युंजय  दूत  आहेत.  या क्षेत्रात  ५७ अपघातांत १३४ जणांचे प्राण वाचविले. ठाणे परिक्षेत्रातही ५४६ दूत असून ५८ अपघातांत  ७८ जणांचे प्राण वाचू शकले. रायगड परीक्षेत्रातही ३५१ दूत असून २९ अपघातांमध्ये २९ जणांचे, नागपूर परीक्षेत्रात  ९ अपघातात ९ जणांचे प्राण वाचवण्यात आले.

महामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार आणि रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न होऊन त्यांचे प्राण वाचावे यासाठी मृत्युंजय दूत संकल्पना राबविली. या दूतांची संख्या ५ हजार असून ती दहा हजापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या अडीच  महिन्यात २५० अपघातग्रस्तांचे प्राण त्यांनी वाचविले आहेत.

भूषणकु मार उपाध्याय, अपर पोलीस महासंचालक,वाहतूक (महाराष्ट्र राज्य)