कुलाबा ते सीप्झ या भुयारी मेट्रोच्या डेपोसाठी आरे कॉलनीच्या हिरव्यागार परिसरातील ३२९२ झाडे तोडावी लागतील, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महानगरपालिकेला कळवले आहे. हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता असून, अनेक सदस्यांचा विरोध असल्याने हे प्रकरण वादळी ठरण्याची शक्यता आहे.

मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आरे कॉलनी येथे कारडेपो उभारण्याचा ‘एमएमआरडीए’चा विचार आहे. त्यानुसार या भागातील हजारो झाडांवर कुऱ्हाड पडणार असल्याने स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले होते. शहरातील एकूणच झाडांची संख्या कमी होत असताना आरे कॉलनीसारख्या हिरव्यागार पट्टय़ाचा विनाश होऊ नये यासाठी ‘वनशक्ती’ ही संस्था उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गेली होती. मेट्रोच्या डेपोसाठी ‘एमएमआरडीए’ २२९८ झाडे तोडण्याच्या बेतात असून त्यांना परवानगी देऊ नये, अशी मागणी या संस्थेने केली होती. मात्र महानगरपालिकेने झाडे तोडण्याची परवानगीच दिली नसल्याने ‘एमएमआरडीए’ला झाडे तोडण्यापासून रोखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने ‘वनशक्ती’ची याचिका निकाली काढली. मात्र आता ‘एमएमआरडीए’च्या मागणीचा प्रस्ताव तयार होत असून तब्बल ३२९२ झाडे तोडण्याचा उल्लेख त्यात आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
एखाद्या प्रकल्पासाठी झाडे तोडण्याची मागणी करण्यात आली की उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्याची पाहणी करण्यात येते. त्यानंतर वृक्ष प्राधिकरणातील सदस्य संबंधित परिसराची पाहणी करून नेमकी किती झाडे तोडावी लागतील व किती झाडांचे पुनरेपण करणे आवश्यक आहे, ते ठरवतात. त्यानंतर त्या प्रस्ताव तयार करून वृक्ष प्राधिकरणाच्या समितीसमोर आणला जातो व त्यावर चर्चा होऊन परवानगी दिली जाते. महापालिकेचे आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतात.
एमएमआरडीएकडून आलेल्या मागणीनंतर वृक्ष प्राधिकरणाच्या काही सदस्यांनी आरे कॉलनीतील परिसराची पाहणी केली. त्यानुसार ३२९२ झाडे तोडावी लागण्याची शक्यता असल्याचे समजते.

पुनर्रोपण कुठे करणार?
झाडे तोडण्याबाबत वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांमध्येच मतमतांतरे आहेत. यातील बहुतांश झाडांचे पुनरेपण करावे, असे मत मांडले गेले असले तरी एवढी झाडे नेमकी कुठे लावणार, हा प्रश्न आहे.