आजपासून नवीन वेळापत्रक

मुंबई : प्रवाशांना झटपट प्रवास घडावा आणि अप व डाऊनला गर्दीच्या वेळेत लोकल फेऱ्या त्वरित उपलब्ध करण्यासाठी पश्चिम रेल्वेने २६ लोकल फेऱ्यांच्या वेळेत बदल करतानाच धिम्या असलेल्या काही लोकल जलद म्हणूनही चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबरपासून म्हणजेच गुरुवारपासून हे वेळापत्रक लागू होईल. त्यामुळे प्रवासात दोन ते अठरा मिनिटांपर्यंतची बचत होणार आहे. याशिवाय गर्दीच्या वेळेत आणखी ३३ लोकल फेऱ्या प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते विरारदरम्यानचा प्रवास हा गर्दीचा व दगदगीचा समजला जाते. तो सुकर करण्यासाठी नोव्हेंबरपासून वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. झटपट प्रवास व गर्दीत त्वरित लोकल उपलब्ध होण्यासाठी चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या १४ आणि विरारच्या दिशेने जाणाऱ्या १२ लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. अपला जाणाऱ्या गाडय़ांमध्ये विरारहून सुटणाऱ्या सहा, भाईंदरच्या दोन, बोरिवलीच्या चार व डहाणू रोडच्या दोन तर डाऊनला जाणाऱ्या फेऱ्यांमध्ये चर्चगेट ते विरारच्या नऊ, तसेच चर्चगेटहून डहाणू रोड, भाईंदर व बोरिवलीच्या प्रत्येकी एका फेरीच्या वेळेत बदल केला आहे.

वेळेत बदल करतानाच गाडय़ांचा वेगही वाढवण्यात आला आहे. अपच्या पाच धिम्या लोकल जलद तर डाऊनच्या तीन धिम्या लोकल जलद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची दोन मिनिटांपासून ते अठरा मिनिटांपर्यंतची वेळेची बचत होणार आहे. या बदलामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेत ३३ लोकल फेऱ्यांची भर पडली आहे.

‘एसी’ लोकलला जादा थांबे

वातानुकूलित लोकल गाडीला आणखी चांगला प्रतिसाद मिळावा यासाठीही पश्चिम रेल्वेने या लोकल गाडीला मरिन लाइन्स, चर्नी रोड, गॅ्रण्ट रोड, दहिसर, मीरा रोड, नायगाव आणि नालासोपारा स्थानकात थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

गर्दीच्या वेळेतील फेऱ्या

                      सध्या        नवीन

सकाळी          १३६             १५०

सायंकाळी       १३०            १४९