गंगाखेड साखर कारखाना पदाधिकाऱ्यांच्या अटकेची मागणी; विधान परिषदेत विरोधकांचा गोंधळ

परभणी जिल्ह्य़ातील गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी या खासगी साखर कारखान्याने तब्बल १२ हजार शेतकऱ्यांच्या नावाने ३३६ कोटी ७१ लाख रुपयांचे कर्ज घेऊन घोटाळा केल्याप्रकरणी विधान परिषदेत शुक्रवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टेला पोलीस अटक का करीत नाही, असा प्रश्नांचा भडिमार करीत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना धारेवर धरले. अखेर मंत्र्यांकडून परिपूर्ण उत्तर येत नसल्याच्या कारणास्तव उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी ही लक्षवेधी राखून ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले.

गंगाखेड साखर कारखान्याचे अध्यक्ष, संचालक मंडळ, बँक अधिकारी यांनी संगनमताने केलेल्या या कर्ज घोटाळ्यासंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व अन्य सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. मुंडे म्हणाले की, जवळपास २८ हजार शेतकऱ्यांच्या नावाने विविध बँकांकडून कारखान्याच्या नावाने १२०० कोटी रुपये कर्ज घेतले आहे. त्याची शेतकऱ्यांना काहीही कल्पना नाही शेतकरी कर्ज घेण्यासाठी बँकांकडे गेले, त्या वेळी त्यांच्या नावाने आधीच कर्ज घेतल्याचे समजले. त्यातून हा मोठा घोटाळा समोर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रकरण गेल्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष व अन्य जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार गुन्हा दाखल केला, परंतु आरोपींना अद्याप अटक का केली नाही, असा सवाल त्यांनी केला.

या लक्षवेधीवर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर उत्तर देण्याचा प्रयत्न करीत होते. १२ हजार शेतकऱ्यांच्या नावाने ३३६ कोटी ७१ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती त्यांनी दिली. न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाचा पोलीस महानिरीक्षक तपास करीत आहेत. ५ जुलै रोजी एफआयआर दाखल केला आहे. ६ जुलैला गुट्टे यांना नोटीस बजावली. ७ जुलै रोजी गुट्टे पोलीस ठाण्यात हजर झाले होते. परदेशात पळून जाऊ नये म्हणून त्यांचा पासपोर्ट ताब्यात घेण्यात आला आहे.

आशीष शेलार यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

मुंबई : पेंग्विन खरेदी आणि राणीच्या बागेतील पुनर्विकासाच्या कंत्राटांची विशेष समितीद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेत करीत मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी शिवसेनेवर हल्ला चढविला. राज्यातील शहरांच्या विकासाबाबत व पालिकांच्या स्थितीबाबत विधानसभेत झालेल्या चर्चेत बोलताना पेंग्विन खरेदीविषयी आक्षेप घेतले. एक पेंग्विन बॅक्टेरियाग्रस्त होता. त्यांच्यासाठी व्यवस्था उभारण्याचे काम दिलेल्या कंपनीकडे अनुभव नाही, कंत्राटदार काळ्या यादीत आहे, पार्टनर कंपन्या बोगस आहेत, आदी आरोप शेलार यांनी केले. राणीच्या बागेच्या पुनर्विकासाच्या कामांविषयीही शेलार यांनी अनेक आक्षेप घेतले.