मुंबईत सोमवारी दिवसभरात ५७ नवे रुग्ण आढळले असून चार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा ४९० वर गेला आहे. त्यापैकी ३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून ५९ जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत, तर अजून १५० संशयित रुग्ण दाखल आहेत.

मुंबईत दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत असून वेगवेगळे परिसर प्रतिबंधित करण्यात येत आहेत. सोमवापर्यंत मुंबईत २२६ परिसर प्रतिबंधित करण्यात आले. अशा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये रुग्ण तपासणीसाठी विशेष दवाखाने सुरू करण्यात आले असून सोमवारी तुळशी वाडी ताडदेव, मालाड, शीव, शिवाजी नगर, देवनार अशा दहा ठिकाणी आणखी दवाखाने सुरू करण्यात आले. त्यात डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे पथक नेमण्यात आले आहे.

आतापर्यंत जे रुग्ण सापडले त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यासाठी पालिकेच्या आरोग्य पथकातर्फे १५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. घरोघरी जाऊन १४०० लोकांचे नमुने गोळा करण्यात आले. या पद्धतीने १३० रुग्ण शोधून काढण्यात पालिकेला यश आले आहे. सोमवारी मृत झालेले चारही रुग्ण हे पुरुष आहेत. त्यात एका ४१ वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे. त्याला ताप आणि जुलाब होत होते. तर ग्लोबल रुग्णालयात दाखल एका ८० वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झाला असून त्यालाही ताप, जुलाब आणि श्वास घेण्यास अडथळा होत होता.

वरळी, भायखळा, अंधेरीत रुग्ण वाढले

सोमवारी आढळलेल्या नवीन रुग्णांमुळे वरळीतील रुग्णांचा आकडा दहाने वाढला आहे. वरळी, प्रभादेवी परिसरातील रुग्णांची संख्या ६८ झाली आहे. त्यापाठोपाठ भायखळा आणि अंधेरी-पाल्र्यातील रुग्णांची संख्या एका दिवसात झपाटय़ाने वाढली आहे. भायखळा परिसरातील रुग्णांची संख्या १९ वरून ४४ झाली आहे, तर अंधेरीतील रुग्णसंख्या २५ वरून ३७ वर गेली आहे.

दादरमध्ये रुग्ण

शिवाजी पार्क परिसरात एक रुग्ण आढळल्यानंतर सोमवारी दादरच्या एस. के.बोले मार्गावरील सौभाग्य इमारतीत एक रुग्ण आढळला. ५४ वर्षांची ही महिला असून तिला ताप, जुलाब होत होते. तसेच तिला टायफॉईड झाला होता. यामुळे सोसायटीतील सौभाग्य व मांगल्य या दोन्ही इमारती प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. या महिलेने कोणताही परदेश प्रवास केलेला नाही.

चेंबूरमध्ये दुसरा रुग्ण

राज्यातील पहिल्या करोनाग्रस्त मृत्यूची नोंद चेंबूरच्या टिळकनगर येथे काही दिवसांपूर्वी झाली होती. १२ मार्चनंतर गेल्या काही दिवसांत या ठिकाणी एकही रुग्ण आढळून आला नव्हता.  मात्र रविवारी टिळक नगर येथे दुसरा करोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले  आहे. या रुग्णावर गेल्या दोन दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यालादेखील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. पालिकेने तो राहत असलेली इमारत प्रतिबंधित केली असून रहिवाशांना इमारतीबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.