ग्रंथालय, वसतिगृह, उपाहारगृह यांचा समावेश; अनेक इमारती २० ते ३० वष्रे जुन्या

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील ६१पैकी तब्बल ३६ इमारतींकडे महापालिकेचा ‘निवासी दाखला’ (ओसी) नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या इमारती नव्याकोऱ्या नसून त्यांचे बांधकाम १९७५ ते २००८ दरम्यान झाले आहे. यात ग्रंथालय, शिक्षकांचे निवासगृह इथपासून ते विद्यार्थ्यांचे वसतिगृह, उपाहारगृह यांचा समावेश आहे.

या संकुलात एकूण ६१ इमारती आहेत. त्यापैकी आयसीएसएसआर वसतीगृह, रीडर्स क्वाटर्स, विद्यार्थ्यांचे उपहारगृह, जुने लेक्चर कॉम्प्लेक्स, जवाहरलाल नेहरू ग्रंथालय, जे. पी नाईक भवन, प्रशासकीय इमारत, आरोग्य केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील मुलांचे वसतिगृह, एमडीके मुलींचे वसतिगृह, नवे-जुने गरवारे इन्स्टिटय़ूट, गरवारे वर्कशॉप, पंडिता रमाबाई महिलांचे वसतिगृह, अल्केश दिनेश मोदी गॅलरी, मराठी भवन, आयडॉल इमारत, झंडू इन्स्टिटय़ूट, अनेक्स बिल्डिंग, लाइफ सायन्स बिल्डिंग, एक्झाम कॅन्टिन, शिक्षक भवन, टपाल कार्यालय, सव्‍‌र्हट क्वाटर्स, न्यू लेक्चर्स कॉम्प्लेक्स, संस्कृत भवन, भाषा भवन, राजीव गांधी सेंटर, आयटी पार्क, शंकरराव चव्हाण टीचर्स ट्रेर्निंग अकादमी,  नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्निकल सेंटर आदी प्रमुख इमारतींना ओसी नाही.

एखादी इमारत राहण्यायोग्य आहे की नाही हे तपासून पालिका ओसी म्हणजे निवासी दाखला देत असते. या शिवाय संबंधित इमारतीत रहिवास करता येत नाही. मुंबईत अनेक इमारतींना ओसी नाही. परंतु, दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या विद्यापीठातही नियम धुडकावून वर्षांनुवर्षे इमारतींचा वापर केला जात आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेकडे मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील इमारतीस दिलेल्या सीसी, आयओडी, ओसीची माहिती मागितली होती. त्यावर पालिकेच्या उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) विशेष कक्षाने येथे विद्यापीठाने बांधलेल्या अनेक इमारतींना ओसी दिली गेली नसल्याचे कळविले. विद्यापीठाकडे या संबंधातील माहितीची विचारणा केली असता एकूण ६१ इमारतींपैकी फक्त २४ इमारतींना ओसी मिळाली असल्याचे कळविण्यात आले, तर ३६ इमारतींना आजही ओसी मिळालेली नाही. केवळ एका इमारतीस अंशत: ओसी मिळाली आहे.

ओसीअसलेल्या इमारती

रानडे भवन, टिळक भवन, वर्कशॉप, आयसीएसएसआर गेस्ट हाऊस, एसपी लेडीज हॉस्टेल, न्यू क्लास क्वाटर्स, महात्मा फुले भवन, ज्ञानेश्वर भवन, युरसिसन अभ्यास स्टाफ क्वाटर्स, सीडी देशमुख भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, प्रेस गोडाऊन, अब्दुल कलाम बिल्डिंग, फिरोजशहा मेहता भवन, अण्णा भाऊ  साठे भवन, पक्षी भवन, ग्लास भवन, कुलगुरू बंगला.