मुंबईमधील करोनामुक्तांचे प्रमाण ९१ टक्क्यांवर पोहोचले असून, रुग्णसंख्येतही घट होऊ लागली आहे. रविवारी दिवसभरात ५७४ करोनाबाधित आढळून आले, तर १५ जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६९ हजार ७०४ वर पोहोचली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. रविवारी मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये १० पुरुष आणि पाच महिलांचा समावेश असून, त्यापैकी ११ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत मुंबईतील १० हजार ५७० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले ५८६ रुग्ण रविवारी करोनामुक्त झाले. आतापर्यंत मुंबईतील दोन लाख ४५ हजार २४५ रुग्ण बरे झाले आहेत.

मुंबईबाहेरील काही रुग्णांची नोंद मुंबईमधील रुग्णांमध्ये झाली होती. त्याचबरोबर काही रुग्णांची नोंद दोन वेळा झाली होती. अशा ३,१७१ रुग्णांची नावे उपचाराधीन रुग्णांमधून वगळण्यात आली आहेत. आजघडीला विविध रुग्णालयांमध्ये ९,९५६ रुग्ण उपचार घेत आहेत.

करोना संसर्गावर नियंत्रण मिळावे यासाठी मोठय़ा प्रमाणावर करोना चाचण्या करण्यात येत आहेत. आतापर्यंत १६ लाख ८५ हजार २८७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांचाही युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. रविवारी दिवसभरात ४१५६ संशयित रुग्णांचा शोध घेण्यात आला असून त्यापैकी ३,७३५ संशयित रुग्ण अतिजोखमीच्या, तर ४२१ रुग्ण कमी जोखमीच्या गटातील आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात २४ तासांत ३७९ नवे रुग्ण

* ठाणे जिल्ह्य़ात रविवारी ३७९ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख १९ हजार ४७३ वर पोहोचली आहे. दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाल्याने करोनाबळींची संख्या ५ हजार ५२१ इतकी झाली आहे.

* रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये नवी मुंबईतील ८९, कल्याण-डोंबिवली शहरातील ८२, ठाणे शहरातील ७७, ठाणे ग्रामीणमधील ४३, मीरा-भाईंदरमधील ३३, बदलापूर शहरातील २६, अंबरनाथ शहरातील १७, उल्हासनगर शहरातील ११ आणि भिवंडी शहरातील १ रुग्णाचा समावेश आहे.

* मृतांमध्ये ठाणे शहरातील २, नवी मुंबईतील २, अंबरनाथमधील १ आणि भिवंडीतील एका रुग्णाचा समावेश आहे.

राज्यात २,५४४ नवे रुग्ण : राज्यात रविवारी २,५४४ करोनाबाधित आढळून आले, तर ३,०६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख १५ हजार ३७९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे करोनामुक्तांचे प्रमाण ९२.४५ टक्के झाले आहे. रविवारी ६० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्युदर २.६३ टक्के आहे.