तोडगा निघाला नाही तर  ५८ कर्मचाऱ्यांच्या हलाखीत वाढ होण्याची भीती

मुंबई : कंपनीने वेतन थकविल्याने प्रवासी जहाजावरील ५८ कर्मचारी मुंबई बंदरात अडकून पडले आहेत. मागील आठवडाभरापासून कंपनीकडून वेतनाबाबत कोणतेच ठोस आश्वासन मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या अडचणींत भर पडली आहे. त्यात जहाजावरील अन्न, पाणी आणि इंधनसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून तोडगा निघाला नाही तर कर्मचाऱ्यांच्या हलाखीत वाढ होणार आहे.

‘एम. व्ही. कर्णिका’ हे ‘जलेश क्रुझ’ या कंपनीचे प्रवासी जहाज आहे. या जहाजावर सुमारे ४२ नाविक आणि १६ हॉटेल कर्मचारी कार्यरत आहेत. जलेश क्रुझ कंपनीची देणी थकल्याने हे जहाज जप्त करण्यात आले आहे. सध्या जहाज मुंबई बंदरात नांगर टाकून उभे आहे. या जहाजाच्या थकीत देण्यांबाबतचा खटला उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सद्य:स्थितीत जहाजावरील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याबाबत ‘जलेश क्रुझ’ कंपनीने असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे वेतन मिळेपर्यंत जहाजावरून खाली उतरण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. परिणामी आठवडाभरापासून कर्मचारी जहाजावर अडकून पडले आहेत. जहाजावरील इंधन संपुष्टात आले आहे. त्यामुळे आपत्कालीन दिवे सुरू करण्यात आले आहेत. तर जहाजावर अन्नाचा तुटवडा असून मॅगी, कॉर्नफ्लेक्स आदीवर कर्मचाऱ्यांना दिवस काढावे लागत आहेत, अशी माहिती जहाजावरील कर्मचारी विक्रांत ठाकूर यांनी दिली. जहाजावर विजेचा तुटवडा असल्याने खोल्यांमधील वातानुकूलन यंत्रणा बंद आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना जहाजावरील डेकवर मोकळ्या जागेत झोपावे लागते. तक्रारीला प्रतिसाद मिळत नसून बोटीवरून खाली उतरण्यास सांगण्यात येत आहे. माझे सुमारे दीड लाख रुपये तर काही कर्मचाऱ्यांचे ५ लाख रुपयांचे वेतन थकीत आहे, अशी माहिती विक्रांत यांनी दिली. तर ‘तीन महिन्यांचे वेतन थकीत आहे. नोकरीला लावणाऱ्या आणि क्रुझ अशा दोन्ही कंपन्यांनी हात वर केले आहेत,’ असा आरोप जहाजावर इलेक्ट्रिशियनचे काम करणारे कार्तिक अय्यर यांनी केला. ‘हा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र जहाजावरील कर्मचाऱ्यांना अन्न, इंधन आणि वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे,’ अशी माहिती शिपिंग डायरेक्टर जनरल अमिताभ कुमार यांनी दिली. तर ‘जहाजावरील ४२ कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई पोर्ट ट्रस्टसह संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कंपनी काम करत आहे. कॅम्पबेल शिपिंगसोबत काम करणाऱ्या ‘पी अँड आय’ क्लबच्या प्रतिनिधींनी जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतन आणि परतण्याचे प्रश्न जाणून घेतले आहेत,’ अशी माहिती कॅम्पबेल शिपिंग कंपनीचे विदिश त्यागी यांनी दिली.

मंत्रालयाने हस्तक्षेप करण्याची मागणी

एम. व्ही. कर्णिका जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत ऑल इंडिया सीफारेर्स जनरल वर्कर्स युनियनने शिपिंग मंत्रालयाला पत्र दिले आहे. ‘पत्राद्वारे कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत मंत्रालयाने हस्तेक्षप करावा. तसेच या कर्मचाऱ्यांना अन्न आणि इंधनाचा पुरवठा करावा,’ अशी मागणी ऑल इंडिया सीफारेर्स जनरल वर्कर्स युनियनचे कार्यकारी अध्यक्ष अभिजित सांगळे यांनी केली आहे.