संजय बापट, मुंबई

मुंबई-अहमदाबाद-नाशिक-पुणे आदी शहरांना जोडणाऱ्या आणि मुंबई-ठाण्यातील वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय ठरणाऱ्या भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्यांच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचा घोळ अखेर मिटण्याची आशा निर्माण झाली आहे.

२०१७ मध्ये ३९० कोटी रुपये खर्चून हा सहापदरी डांबरी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अवघ्या दीड-दोन वर्षांतच आणि काम पूर्ण होण्यापूर्वीच आता या मर्गावरील वाढती वर्दळ लक्षात घेऊन डांबरीकरणाऐवजी त्याचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे.  सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम)मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर काँक्रीटीकरणाचा साक्षात्कार एमएसआरडीसीला झाल्याची चर्चा महामंडळात ऐकावयास मिळत आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.

भिवंडी-कल्याण-शिळफाटा हा रस्ता  मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे, कल्याण-निर्मल-नांदेड या महामार्गाना जोडणारा आणि पर्यायाने ठाणे-मुंबईतील वाहतूक कोंडीला पर्यायी ठरेल असा महत्त्वाचा मार्ग आहे. जवाहरलाल नेहरू बंदर किंवा पुण्याहून येणारी- जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी हा जोड रस्ता महत्त्वाचा आहे.

वाहतूकीत होणारी वाढ लक्षात घेऊन  ३८९.६३ कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे सहापदरीकरण आणि डांबरीकरण करण्याचा निर्णय नोव्हेंबर २०१७ मध्ये सरकारने घेतला होता. एमएसआरडीसीवर या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या तफावत निधीपोटी १५० कोटी एमएसआरडीसीला देताना प्रकल्पाच्या खर्चापोटी सन २०३६ पर्यंत या मार्गावर टोल वसुलीची मुभाही महामंडळास देण्यात आली होती. या निर्णयानुसार महामंडळाने ऑगस्ट २०१८मध्ये सल्लागार आणि कंत्रादार यांची नियुक्ती करीत हे काम ३० महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले. हे काम सुरू असतानाच  ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात या मार्गाची पाहणी केली, आणि येथे डांबरीकरण टिकणारे नाही, पावसाळ्यात मार्गावर खड्डे पडत असल्याचे आणि दुरुस्तीसाठी मोठय़ाप्रमात निधी वाया जात असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून या रस्त्याचे डांबरीकरणाऐवजी क्राँक्रीटीकरण करण्याचे आदेश  महामंडळास दिले.

त्यानुसार आता मूळ प्रस्तावात बदल करून या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी महामंडळाच्या संचालक मंडळासमोर ठेवण्यात आला आहे. त्यावर  संचालक मंडळाची मोहोर उमटेल, असे सूत्रांनी सांगितले. मात्र मंत्र्याची ही सूचना महामंडळावरील खर्चभार ४०० कोटींनी वाढविणारी असून त्यासाठी तफावत निधीपोटी ३८५ कोटी रुपये सरकारने द्यावेत, अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नव्या प्रस्तावानुसार भिंवडी-कल्याण-शिळफाटा रस्त्यांच्या सहापदरीकरण आणि काँक्रीटीकरणासाठी ७७३.६६ कोटी, मानपाडा चौक, सोनारपाडा चौक (सुयोग हॉटेल ते पेंढारकर कॉलेज) आणि बदलापूर चौक (काटई नाका) या ठिकाणी १९४ कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत.