विविध आरक्षणांमुळे पदव्युत्तर प्रवेशप्रक्रियेत गोंधळ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मराठा समाजासाठी एकूण कोटय़ाच्या आठ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या असून त्यामुळे खुल्या गटासाठी काही प्रमाणात जागा उपलब्ध झाल्या असल्या, तरी पात्र विद्यार्थ्यांच्या तुलनेत अद्यापही पुरेशा जागा उपलब्ध झालेल्या नाहीत.

खासगी महाविद्यालयांमधील प्रवेशाची वाट तर अधिक बिकट झाली असून त्यासाठी सरसकट सर्व जागा गृहीत धरून त्यातील १६ टक्के आणि १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. प्रवेशासाठी सर्वाधिक विद्यार्थी पात्र ठरलेल्या खुल्या गटासाठी शासकीय महाविद्यालयांमध्ये २३३ जागा, तर खासगी महाविद्यालयांमध्ये ३७ जागा उपलब्ध आहेत.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पूर्वीपासून असलेली सामाजिक आरक्षणे आणि नव्याने भर पडलेले मराठा आरक्षण, आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांसाठीचे आरक्षण यामुळे प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला आहे. आता या गोंधळात नवी भर पडली आहे. प्रत्येक विषयाला उपलब्ध असलेल्या एकूण जागांचा विचार करून त्यापैकी १६ टक्के जागा मराठा समाजासाठी आणि १० टक्के जागा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ठेवण्याचा विचार वैद्यकीय शिक्षण विभागाकडून करण्यात येत होता. मात्र आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण कोटय़ाऐवजी राज्याच्या कोटय़ातील ८ टक्के जागा ग्राह्य़ धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  खुल्या गटाला दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र वैद्यकीय शिक्षण विभाग उभे करत असला तरी प्रत्यक्षात या शाब्दिक आणि आकडेवारीच्या खेळात अनेक विषयांना खुल्या गटातील एक-दोन विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळू शकणार आहे.

खासगी महाविद्यालयांमधील प्रवेशाची वाट अधिकच बिकट आहे. खासगी महाविद्यालयांमध्ये मात्र एकूण प्रवेश क्षमतेचा विचार करूनच १६ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे संस्थांतर्गत कोटा ३५ टक्के आणि अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी असलेला १५ टक्के कोटा वगळून राहिलेल्या ५० टक्के जागांवर आरक्षण लावण्यात येणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील ५० टक्के जागा अखिल भारतीय विद्यार्थ्यांसाठी असतात. त्यामुळे आरक्षण देताना राज्याच्या कोटय़ाचा विचार विभागाने केला आहे. मात्र खासगी महाविद्यालयांमधील सर्व जागा राज्याच्या स्तरावरच भरण्याची मुभा असते. त्यामुळे त्या सर्व जागा गृहीत धरून त्यानुसार आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. शासनाच्या आणि न्यायालयाच्या आदेशानुसार जागांची विभागणी करण्यात आली आहे, असे प्रवेश परीक्षा कक्षाचे संचालक आनंद रायते यांनी सांगितले.

खुल्या गटातील पात्र विद्यार्थ्यांची संख्या अधिक

राज्याच्या कोटय़ातून प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या तीन हजार ९१३ विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी खुल्या गटातील आहेत. पात्र विद्यार्थ्यांपैकी ८५ विद्यार्थी (२.२ टक्के) केंद्राच्या नियमानुसार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या आरक्षणासाठी पात्र ठरले आहेत. मराठा कोटय़ानुसार आरक्षणासाठी २११ विद्यार्थी (५.४ टक्के) पात्र ठरले आहेत. जवळपास दोन हजार २४ विद्यार्थी खुल्या गटातील प्रवेशासाठी पात्र आहेत. खुल्या गटासाठी शासकीय महाविद्यालयांमध्ये ९७२ जागांपैकी २३३ तर खासगी महाविद्यालयांमध्ये ४६९ जागांपैकी ३७ जागा उपलब्ध आहेत.