पावसाळ्याआधीच्या तयारीच्या निमित्ताने शहरभरातले सर्व रस्ते खणून ठेवल्याचे दृश्य दिसत असले तरी पालिकेच्या मते मात्र मान्सूनच्या पूर्वतयारीसाठी रस्त्यांचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून विविध केबल टाकण्यासाठी खणलेले ८० टक्के चर बुजवण्यात आले आहेत. दरवर्षी पालिका अधिकारी असे दावे करत असल्याने या वर्षीच्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे, ते लवकरच कळेल.
शहरातील दर सहा किलोमीटरमागील एक किलोमीटर रस्ता खणला गेला आहे. उड्डाणपुलांचे काम, खोदलेले रस्ते यामुळे शहरभरातील वाहतुकीचेही बारा वाजले आहेत. मात्र हे खणलेले ८० टक्के चर बुजवण्यात आल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन यांनी केला आहे. पालिकेने विविध संस्थांना २७४ किलोमीटर लांबीचे चर खणण्याची परवानगी दिली होती. त्यापैकी २५५ किलोमीटरचे चर खणण्यात आले व त्यातील २०० किलोमीटरचे चर बुजवण्यात आले, असा दावा पालिकेच्या त्यांनी केला. पूर्वी चर खणण्याचे काम संबंधित कंपनीलाच करावे लागे. मात्र हे चर व्यवस्थित बुजवले जात नसल्याचे लक्षात आल्यावर पालिकेने कंपनीकडून शुल्क घेऊन स्वतच चर बुजवण्याचे काम सुरू केले आहे. तरीही मुंबईत सर्वत्र रस्ते अजूनही खणलेले आहेत़  ‘थोडी कळ काढा’ असा सल्ला पालिकेचे अधिकारी देत असले तरी पावसाळ्याविषयी नागरिक साशंक आहेत. पावसाळ्यात पडणाऱ्या खड्डय़ापेक्षाही मुंबईकरांना या रस्तेदुरुस्तीचा ताप अधिक सहन करावा लागत आहे.
प्रशासन म्हणते..
*केवळ ५५ किलोमीटरचे चर बुजवण्याचे बाकी असून पावसाळ्यापूर्वी सर्व चर बुजवले जातील.
*रस्त्यांची हाती घेतलेली कामेही ६० टक्के पूर्ण झाली असून ३१ मे पूर्वी सर्व कामे पूर्ण होतील़