रस्ते घोटाळय़ाचा दुसरा अहवाल आयुक्तांना सादर; दोन्ही अहवालांतील दोषींवर दुहेरी कारवाईची शक्यता

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणणाऱ्या रस्तेकामातील गैरव्यवहारांचा दुसरा अहवाल महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. २०० रस्त्यांच्या घोटाळय़ातील चौकशी अहवालात आधीच्या घोटाळय़ात दोषी आढळलेल्या ८२ अभियंत्यांची नावे आहेत. या अभियंत्यांच्या शिक्षेत वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, दोन्ही अहवाला एकसमान दोष आढळल्यास सदर अभियंत्याची शिक्षा वाढवली जाणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

एक हजार कोटी रुपयांहून अधिक रस्तेकामातील घोटाळ्याची चौकशी असलेला दुसरा आणि अंतिम अहवाल आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. २०० रस्त्यांच्या घोटाळ्याचा चौकशीत पहिल्या अहवालातील ८२ अभियंत्यांना दोषी धरण्यात आले असून त्यांच्यापैकी काहींवर बडतर्फी व पदावनतीची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मात्र त्याला आयुक्तांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत संमती दिली नव्हती. जानेवारीत पहिला अहवाल सादर करण्यात आला होता व त्यात चौकशी केलेल्या १०० पैकी ९६ अभियंत्यांना दोषी धरण्यात आले होते. चार अभियंत्यांना बडतर्फ तर सात जणांची पदावनती करण्यात आली होती.

रस्तेकामामधील अनियमिततेबाबत चौकशी करण्याची मागणी होऊन अडीच वर्षे उलटल्यावर हा अहवाल आला आहे. ३१ जानेवारीपर्यंत या अहवालाला मुदतवाढ देण्यात आली होती. पहिला अहवाल ६ जानेवारी रोजी आयुक्तांना देण्यात आला. दुसऱ्या चौकशी अहवालाची प्रत महापौरांना अजून देण्यात आलेली नाही.

पहिल्या अहवालात १०० अभियंत्यांवर २४८ दोषारोपपत्रे ठेवण्यात आली. रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी ‘पीएमए’ या खासगी संस्थेला नेमले असले तरी त्यावर लक्ष ठेवणे कर्मचाऱ्यांची जबाबदारी होती, असे नमूद करून प्रत्येक अभियंत्यांकडील एकूण रस्त्यांची संख्या व कामाची जबाबदारी यांचा विचार करून शिक्षा निश्चित करण्यात आली. यातील ९६ कर्मचाऱ्यांना बडतर्फीपासून एक वर्षांची वेतनवाढ रोखण्यापर्यंतच्या शिक्षा देण्यात आल्या. मात्र, या ९६ पैकी ८२ कर्मचारी २०० रस्त्यांच्या कामांच्या गैरव्यवहारातही सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षेत वाढ होण्याची शक्यता आहे.

दोन्ही गैरव्यवहारांच्या चौकशी अहवालात एकसमान दोषारोप असलेल्या अभियंत्यांच्या शिक्षेत वाढ केली जाणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आधीच्या रस्ते करताना खडीचा थर आणि दुसऱ्या अहवालात समाविष्ट रस्त्यांच्या खडीचा थर साधारण सारखा असला तर तो एकसमान दोष गणला जाणार आहे. मात्र रस्ता अधिक अयोग्य प्रकारे करण्यात आला तर मात्र शिक्षेत वाढ होईल. दोष कमी आढळल्यास आधीची शिक्षा कायम ठेवली जाईल, असेही प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

पहिल्या अहवालातील दोषींवरील कारवाई

  • चार जण बडतर्फ
  • सात जणांची पदावनती
  • तिघांच्या निवृत्तिवेतनात कपात
  • सहा जण पुन्हा मूळ वेतनावर
  • ६५ जणांची वेतनवाढ एक ते तीन वर्षांसाठी बंद
  • ११ जणांना रोख दंड