News Flash

धरणांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा

गतवर्षांच्या तुलनेत ११ टक्के वाढ

संग्रहित छायाचित्र

गतवर्षांच्या तुलनेत ११ टक्के वाढ

मुंबई : राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्वच प्रादेशिक विभागांतील धरणांत चांगला जलसाठा झाला आहे. राज्यातील लघू, मध्यम आणि मोठय़ा अशा सर्व धरणांत सध्या एकूण ८२.३६ टक्के पाणीसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत जलसाठय़ात ११ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे करोनाच्या संकटात निदान वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न तरी सुटला आहे.

हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचे भाकीत वर्तवले होते. जूनमध्ये पावसाने काही काळ दडी मारल्यानंतर जुलै, ऑगस्ट या महिन्यांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील १४१ मोठय़ा धरणांत ९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. राज्यातील सर्वात मोठे असे उजनी धरण १०० टक्के  भरले असून कोयना धरणातही ९९.७२ टक्के  पाणीसाठा झाला आहे, तर मराठवाडय़ातील जायकवाडी धरणातही ९९.७७ टक्के  पाणीसाठा झाला आहे. तसेच राज्यातील २५८ मध्यम धरणांमध्ये ७५.५२ टक्के  पाणीसाठा झाला आहे. राज्यात २८६८ लघू प्रकल्पांमध्ये मात्र पाणीसाठय़ाचे प्रमाण तुलनेत कमी असून त्यात ४०.१३ टक्के  पाणीसाठा झाला आहे. मोठे, मध्यम व लघू अशा सर्व धरणांतील पाणीसाठय़ाचा विचार करता राज्यातील एकू ण ३२६७ धरणांमधील उपयुक्त पाणीसाठय़ाची क्षमता ४० हजार ७९२ दलघमी असून २० सप्टेंबरअखेर ३३ हजार ५९७ दलघमी पाणीसाठा झाला आहे. हे प्रमाण ८२.३६ टक्के  असून मागच्या वर्षी याच काळात ७१.५ टक्के  पाणीसाठा होता.

विभागनिहाय पाणीसाठय़ाची आकडेवारी पाहता सर्वाधिक ८७.९५ टक्के  पाणीसाठा पुणे विभागातील धरणांमध्ये आहे, तर औरंगाबाद विभागात सर्वात कमी तरीही ७१.७९ टक्के  पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी औरंगाबाद विभागात या काळात अवघा ३८ टक्के  पाणीसाठा होता हे पाहता यंदा जवळपास दुप्पट पाणी साठले आहे. नाशिक विभागात ८४.३० टक्के , कोकणात ८३.३२ टक्के , नागपुरात ८१.८८ आणि अमरावतीत ७७.४६ टक्के  पाणीसाठा आहे.

मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात पुढील २४ तासांत सर्वदूर पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात ढगाळ हवामान आहे. अधूनमधून ऊन पडत असले, तरी सायंकाळनंतर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 12:49 am

Web Title: 82 percent water storage in maharashtra dams zws 70
Next Stories
1 प्रशांत दामलेंशी गप्पांचा योग
2 करिअर निवडताना आजच्या अस्थिरतेची धास्ती नको
3 खासगी रुग्णालयात दुप्पट ऑक्सिजनचा वापर!
Just Now!
X