नोंदणी केलेल्या आणि लस घेण्यास इच्छुक असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणत्याही केंद्रावर लस घेण्याचा पर्याय दिल्यामुळे मुंबईत शुक्रवारी उद्दिष्टाच्या ९२ टक्के लसीकरण पूर्ण झाले, तर राज्यात हे प्रमाण ७६ टक्के आहे.

‘को-विन’ अ‍ॅपद्वारे तयार होणाऱ्या यादीत नाव आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना निश्चित केलेल्या केंद्रावर जाऊन लस घेण्याची मुभा होती. एकीकडे यादीतल्या कर्मचाऱ्यांना संदेश न पोहोचणे, दोनदा नावे येणे इत्यादी त्रुटी आहेत, तर दुसरीकडे यादीतील पालिकेचे कर्मचारी लस घेण्यास तुलनेने कमी येत आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या दिवसापासून मुंबईत उद्दिष्टाच्या जवळपास ५० ते ५२ टक्के लसीकरण होत होते. ही अडचण लक्षात घेऊन पालिकेने लस घेण्यासाठी नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणत्याही केंद्रावर लस घेण्याची मुभा शुक्रवारपासून दिली. तसेच केंद्रांनाही यादीबाह्य़ आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे यादीत जोडून लस देण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. परिणामी शुक्रवारी लसीकरण केंद्रांवर मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती.

मुंबईत शुक्रवारी ३,५३९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. त्यात सर्वाधिक म्हणजे ६८५ कर्मचारी ‘केईएम’मधील आहेत. त्या खालोखाल वांद्रे येथील भाभा रुग्णालयात ५७२ आणि राजावाडी रुग्णालयात ५१७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. ‘केईएमच्या वर्धापन दिनानिमित्ताने शुक्रवारी अनेक कर्मचाऱ्यांनी लस घेतली. त्यामुळे तेथे उद्दिष्टापेक्षा अधिक लसीकरण झाल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. आमच्याकडे सकाळपासून आरोग्य कर्मचाऱ्यांची लस घेण्यासाठी रांग लागली होती. यादीतील केवळ २० टक्के कर्मचारी लस घेण्यास आले, तर इतर यादीबाह्य़ आहेत. त्यापैकी बहुतांश खासगी रुग्णालयातील असल्याची माहिती नायरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात ७६ टक्के

मुंबई : राज्यात शुक्रवारी उद्दिष्टाच्या ७६ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून २१ हजार ६१० कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. सर्वाधिक लसीकरण बीडमध्ये (१५१ टक्के) झाले. त्यापाठोपाठ हिंगोली, अमरावती, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ात १०० टक्कय़ांपेक्षा अधिक लसीकरण झाले. आत्तापर्यंत राज्यात ७४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यापैकी ३१८ जणांना कोव्हॅक्सीन लस दिली गेली.

‘जेजे’मध्ये अत्यल्प प्रतिसाद

जे.जे.मधील लसीकरण केंद्रावर शुक्रवारी कोव्हॅक्सिन लस घेण्यासाठी २५ कर्मचारी आले. ते सर्वजण जे.जे. रुग्णालयातीलच होते. सकाळी नऊ ते दीड वाजेपर्यंत अ‍ॅप सुरू नसल्याने काम ऑफलाइनच सुरू होते, अशी माहिती जे.जे. रुग्णालयातील सामाजिक औषधशास्त्र विभागाचे डॉ. ललित संख्ये यांनी दिली.

..तर त्याच केंद्रावर लस घेणे बंधनकारक

यादीबाह्य़ कर्मचाऱ्यांना कोणत्याही केंद्रावर लस घेण्याची मुभा आहे. परंतु यादीत नाव आलेल्या आणि संदेश आलेल्यांना नेमून दिलेल्या केंद्रावरच लसीकरणासाठी जावे लागणार आहे, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यानी सांगितले.

तांत्रिक अडचणी कायम

यादीबाह्य़ नावे अ‍ॅपमध्ये जोडण्याचा पर्याय उपलब्ध केला असला तरी नोंदणी केलेल्या काही कर्मचाऱ्यांची नावे अ‍ॅपमध्ये नसल्याने त्यांना लस न घेताच परतावे लागले. तसेच अ‍ॅप अत्यंत संथगतीने चालत असल्याने नोंदणी करण्यास वेळ लागत आहे. केंद्रावर गर्दी झाल्यास मोठी अडचण होती, असे पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.