घाटकोपर-वसरेवा-घाटकोपर मेट्रोसाठी सुविधा

घाटकोपर-वसरेवा-घाटकोपर या मुंबई ‘मेट्रो वन’चे तिकीट प्रवाशांना आता आणखी सहजतेने उपलब्ध होणार आहे. डेबिट-क्रेडिट कार्डद्वारेही मेट्रोचे तिकीट देण्याचा निर्णय घेतला असून गुरुवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे मेट्रो वनकडून सांगण्यात आले.

मुंबई मेट्रो वन सेवेत येताच प्रवाशांसाठी मासिक ट्रिप पास, स्टोअर व्हॅल्यू पास व स्कीप क्यू या तिकीट सेवा सुरू केल्या. यात एकेरी आणि दुहेरी (परतीचाही) प्रवास अशा सुविधाही आहेत. सार्वजनिक वाहतुकीमध्ये तिकीट घेताना डेबिट-क्रेडिट कार्टसारख्या अन्य पर्यायांच्या शोधात प्रवासी असतात. त्यामुळेच मुंबई मेट्रो वनने डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे तिकीट देण्याचा निर्णय घेतला. जवळपास साडेचार लाख मेट्रो प्रवाशांना त्याचा फायदा मिळणार आहे.  इन्स्टामोजो या पेमेंट गेटवेने टेक्नॉलॉजी पार्टनर म्हणून ही सुविधा उपलब्ध केली आहे. या सुविधेत मेट्रो स्थानकात पीओएस (पॉइंट ऑफ सेल) मशीन कार्यान्वित करण्याची गरज नाही. तसेच प्रवाशांना त्यांच्या स्मार्ट भ्रमणध्वनीमध्ये अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याची गरज नाही. प्रवाशांनी मेट्रो तिकीट खिडक्यांवर जाऊन स्टॅटिक क्यूआर कोड भ्रमणध्वनीवर स्कॅन करून किंवा खिडक्यांवर नमूद केलेली लिंक टाइप करून आणि डेबिट-क्रेडिट कार्डचा तपशील देऊन शुल्क भरता येणार आहे. त्यानंतर त्यांचे तिकीट किंवा स्मार्ट कार्ड रिचार्ज करून मिळेल.

या सुविधेतील पैसे भरणावर प्रवाशांचे वर्चस्व राहणार असून प्रवाशांना त्यांचे कार्ड स्वाइप करण्यासाठी कोणाच्याही हाती द्यावे लागणार नाही. प्रवाशांनी तिकीट खिडक्यांवर नमूद केलेली लिंक त्यांच्याकडे सेव्ह केल्यास खिडक्यांवर येण्यापूर्वी किंवा आल्यावर त्यातून पैसे देऊ शकतात. तिकीट निश्चित झाल्याचा संदेश संबंधित खिडकीवर दाखवून त्यांना तिकीट घेता येणार आहे.