प्रकल्पातील अडसर दूर होण्याचे संकेत; ‘मे. ऑर्नेट’बाबत संभ्रम कायम

शहरातील सर्वात मोठय़ा समूह पुनर्विकासाचा मान असलेल्या काळाचौकीतील सुमारे ३३ एकरवर पसरलेल्या अभ्युदयनगर वसाहतीच्या पुनर्विकास प्रक्रियेतून आता टाटा हाऊसिंग ही नामांकित कंपनी बाहेर पडली आहे. एकीकडे या प्रकल्पाबाबत अंतिम विकासक म्हणून रुस्तमजी समूहाची निवड झालेली असतानाही त्याबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण करणाऱ्या प्रतिस्पर्धी मे. ऑर्नेट हाऊसिंगसोबत टाटा हाऊसिंगची भागीदारी होती.

विजय ग्रुप आणि श्रीपती ग्रुप या बडय़ा विकासकांमधील स्पर्धेतून बाहेर पडलेल्या अभ्युदयनगरच्या पुनर्विकासासाठी स्थानिक महासंघाने पुढाकार घेतला आणि निविदा प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेत ४७ गृहनिर्माण संस्थांपैकी २६ संस्थांनी मे. किस्टोन रिअल्टर्सला (रुस्तमजी) तर चार संस्थांनी मे. ऑर्नेट हाऊसिंगला पसंती दिली. निविदा प्रकियेतील तरतुदीनुसार सर्वाधिक संस्थांचा पाठिंबा मिळविलेला विकासक अंतिम ठरणार होता. त्यानुसार मे. किस्टोन रिअल्टर्सची अंतिम विकासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यानंतरही दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मे. ऑर्नेट हाऊसिंगने त्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. परंतु न्यायालयातूनही दिलासा मिळाला नाही. शहर आणि दिवाणी न्यायालयात याबाबत अंतिम निकाल आलेला नाही, असे स्पष्ट करीत ऑर्नेट हाऊसिंगने प्रयत्न सुरूच ठेवले. मे. किस्टोन रिअल्टर्सने ६८४ चौरस फुटांचे घर सुधारित प्रस्तावात देण्याची तयारी दर्शविल्यानंतर मे. ऑर्नेट हाऊसिंगने ७०० चौरस फुटांचा प्रस्ताव दिला. त्यामुळे रहिवाशांमध्ये पुन्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. परंतु टाटा हाऊसिंग तसेच शापुरजी पालनजी अँड कंपनीसोबत भागीदारी असलेल्या मे. ऑन्रेट हाऊसिंगसोबतचा करारनामा रद्द करण्यात आल्याचे पत्र टाटा हाऊसिंगनेच अभ्युदयनगर महासंघाला पाठविल्यामुळे आता मे. ऑर्नेटच्या दाव्याबाबत रहिवाशांमध्ये संभ्रमआहे. या पत्राची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे.

निविदाप्रक्रियेनुसार मे. किस्टोन रिअल्टर्स हे अंतिम विकासक आहेत. ऑर्नेट हाऊसिंगचा आता काहीही संबंध नाही. परंतु रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे प्रकल्पाला विलंब होत आहे. उर्वरित १७ गृहनिर्माण संस्थांकडून निवड ही औपचारिकता राहिली आहे. त्याबाबत कायदेशीर मत मागविण्यात आले आहे, असे महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार काटकर यांनी स्पष्ट केले आहे.

निविदा प्रक्रियेतील नियमानुसार आपण अंतिम विकासक आहोत. मे. ऑर्नेट हौसिंगकडून रहिवाशांची दिशाभूल सुरू आहे. अभ्युदयनगरवासीयांचे  घरकुलाचे स्वप्न विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

चंद्रेश मेहता, संचालक, मे. किस्टोन रिअल्टर्स (रुस्तमजी समूह)

अभ्युदयनगर पुनर्विकासाबाबत शहर व दिवाणी न्यायालयातील याचिका प्रलंबित आहे. त्याचा निकाल यायचा आहे. टाटा हौसिंगसोबतचा करारनामा अद्यापही अस्तित्वात आहे. त्यांनी नोटिसा दिल्या आहेत.

विजय मछिंदर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मे. ऑर्नेट हाऊसिंग