रेल्वेला उपरती; दुसरी वातानुकूलित लोकल सेवेत आणण्यापूर्वी प्रवाशांची मते जाणून घेणार

मुंबई : वातानुकूलित लोकल आणून सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास विस्कळीत केल्यानंतर आता रेल्वेला प्रवाशांना विश्वासात घेण्याची उपरती झाली आहे. वातानुकूलित लोकलचा प्रवास परवडणारा आहे का, प्रवास भाडय़ात बदल करणे गरजेचे आहे का, अशा प्रश्नांवर आता पश्चिम रेल्वे प्रवाशांची मते जाणून घेणार आहे. पश्चिम रेल्वेवरील पहिल्या वातानुकूलित गाडीला प्रवाशांकडून थंड प्रतिसाद आहे. त्यात या मार्गावर दुसरी वातानुकूलित गाडी चालविण्याचा विचार आहे. त्यामुळे वेळापत्रक आणखी बाधित होऊन परिस्थिती चिघळण्याची भीती असल्याने सर्वेक्षणाचे ‘वरातीमागून घोडे’ नाचवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

दोन वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेवर पहिली बारा डबा वातानुकूलित लोकल दाखल झाली. ही लोकल चालवण्यासाठी सामान्य लोकलच्या बारा फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या लोकलचे जादा भाडे परवडणारे नसल्याने प्रवाशांकडूनही त्याला फारसा प्रतिसाद नाही. दुसरी वातानुकूलित लोकल ताफ्यात आल्यानंतर पश्चिम रेल्वेने शनिवार व रविवारीही वातानुकूलित सेवा सुरू केली. पश्चिम रेल्वेकडे आणखी दोन लोकल ताफ्यात आहेत. मात्र प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे या लोकल चालवणे कठीण होऊन बसले आहे. या गाडय़ांचे डबे सामान्य लोकलला जोडून अर्ध वातानुकूलित लोकल सेवा देण्याचाही पर्याय अजमावण्यात येत आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने मंगळवारपासून सर्वेक्षण हाती घेतले आहे.

मध्य रेल्वेची सूचना

पश्चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वेलाही प्रवासी मिळविण्यासाठी यातायात करावी लागते आहे. म्हणून वातानुकूलित लोकल प्रवास मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या आवाक्यात यावा यासाठी या गाडीत प्रथम आणि द्वितीय वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे मंडळाला याबाबत पत्र लिहिले असून प्रवाशांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी वातानुकूलित लोकलच्या द्वितीय श्रेणीचे भाडे वाढवण्यात यावे. तिकीट दर साध्या लोकलच्या द्वितीय श्रेणीपेक्षा अधिक, मात्र प्रथम दर्जापेक्षा कमी असावे. तसेच प्रथम श्रेणीत मोबाइल चार्जिग, आरामदायी आसन या सुविधा असाव्यात, अशा सूचना केल्या आहेत.

सर्वेक्षणातील प्रश्न

  •  सामान्य प्रवासी म्हणून वातानुकूलित लोकलचा प्रवास परवडणारा आहे का?
  •  सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करून वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या चालवणे योग्य आहे का?
  •  चर्चगेट ते बोरिवली, विरार या स्थानकांदरम्यान कोणत्या मार्गावर वातानुकूलित लोकल चालवणे योग्य आहे?
  •  कोणत्या वेळेत ही लोकल चालवली पाहिजे?
  •  वातानुकूलित लोकलचे भाडे बदलणे आवश्यक आहे का?