चर्चगेटहून लोकल धावण्याची अफवा

मुंबईकरांचा उपनगरीय प्रवास गारेगार करण्यासाठी मध्य रेल्वेवर केव्हाचीच दाखल झालेली वातानुकूलित लोकल अद्याप चाचणीतून उत्तीर्ण झाली नसली, तरी बुधवारी ही लोकल खूप ‘धावली’. ही लोकल बुधवारी संध्याकाळी पाच वाजता चर्चगेट ते विरार धावणार असल्याचे संदेश व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रसृत झाले आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. अखेर हे संदेश म्हणजे अफवा पसरवण्याचा प्रकार असल्याचे स्पष्टीकरण देता देता या अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा भाग म्हणून ओळखली जाणारी वातानुकूलित लोकल अजूनही चाचणीच्या फेऱ्यांमधून सुटलेली नाही. या गाडीच्या कारशेडमधील चाचण्या पूर्ण झाल्या असल्या, तरी या चाचण्यांचा अहवाल अद्याप आरडीएसओने अभ्यासून मंजूर केलेला नाही. त्यामुळे या गाडीच्या प्रत्यक्ष रेल्वेमार्गावरील चाचण्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी अजून बराच काळ जाणार आहे.

या पाश्र्वभूमीवर बुधवारी संध्याकाळी पाच वाजता चर्चगेट ते विरार यांदरम्यान वातानुकूलित लोकल धावणार असल्याचा संदेश व्हॉट्सअ‍ॅपवरून बुधवार सकाळपासून पसरू लागला. साध्या तिकीट वा पासधारकांनाही त्याच तिकिटात या गाडीतून प्रवास करता येणार असल्याचेही या संदेशात म्हटले होते. हा संदेश वाचून सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे प्रसारमाध्यमांमधील छायाचित्रकारांचीही एकच धांदल उडाली होती. या संदेशाची शहानिशा करून घेण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयातील दूरध्वनी खणखणू लागले. हा संदेश म्हणजे अफवा असल्याचे सांगता सांगता या अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ आले होते.