नियमित गाडय़ांच्या प्रवाशांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या वेळेतील नियमित गाडय़ा रद्द करून त्या वेळेत वातानुकूलित (एसी) लोकल चालवण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर सर्वसामान्य प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. या पाश्र्वभूमीवर आता वातानुकूलित लोकल कमी गर्दीच्या वेळेत चालवता येतील का, याचा विचार रेल्वे प्रशासनाने चालवला आहे.

वातानुकूलित लोकलमुळे बोरिवली ते चर्चगेट दरम्यानच्या सध्याच्या सहा नियमित फेऱ्यांवर गदा आली आहे. १ जानेवारीपासून विरार ते चर्चगेटदरम्यान ही गाडी चालविली जाणार आहे. त्यावेळी तब्बल बारा नियमित फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांच्या त्रासात भरच पडणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वातानुकूलित लोकल गाडीच्या जास्तीत जास्त फेऱ्या कमी गर्दीच्या वेळी चालविण्याचा रेल्वेचा विचार आहे. त्यामुळे सध्याच्या रद्द केलेल्या फेऱ्या पुन्हा सुरू होतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेतील सूत्रांनी दिली. अर्थात या संदर्भातील निर्णय वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो यानंतर घेऊ, असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकऱ्याने सांगितले.

अर्थात येत्या काळात आणखी दहा वातानुकूलित लोकल गाडय़ा मुंबईत दाखल होणार आहेत. यातील एक लोकल वर्षभरात पश्चिम रेल्वेवर येईल. ही आणखी एक गाडी चालविण्याकरिता वेळापत्रकात बदल करताना रेल्वे प्रशासनाची चांगलीच कसोटी लागणार आहे. मात्र आरामदायी प्रवासाकरिता ओळखल्या जाणाऱ्या ओला-उबरच्या तुलनेत वातानुकूलित लोकलचा प्रवास तुलनेत स्वस्त आणि वेगाचा ठरणार असल्याने त्याला प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल, असा विश्वास रेल्वेचे अधिकारी व्यक्त करत आहेत.

खासगी टॅक्सींना पर्याय?

बोरिवली ते चर्चगेट (अंधेरीपर्यंतही जलद) वातानुकूलित लोकल गाडीच्या प्रवासाकरिता फक्त ४७ मिनिटे लागतात. तर ही गाडी बोरिवली ते अंधेरीदरम्यान धिमी असेल तर प्रवासासाठी ५५ मिनिटे लागतात. पण याच प्रवासासाठी रस्तेमार्गे दीड-दोन तास लागू शकतात. ओला, उबर किंवा खासगी वातानुकूलित वाहनाने हा प्रवास केल्यास तो वातानुकूलित लोकलच्या तुलनेत महाग ठरतो. ४० किलोमीटर अंतर ओलाने कापल्यास विविध श्रेणीच्या प्रवासाकरिता ६९५ ते १,२०१ रुपये मोजावे लागतात. तर ओला शेअरचे भाडे याच मार्गासाठी ४७३ रुपये आहे. उबरच्या या मार्गावरील प्रवासाकरिता साधारणपणे ४३० ते १,१२० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे एसी लोकल हा ओला, उबरच्या प्रवाशांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.