टाळेबंदी शिथिल होताच मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची वर्दळ आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या तब्बल १९ हजार वाहनांवर सप्टेंबर महिन्यात कारवाई करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

मुंबई ते पुणे महामार्गावर ट्रक, कंटेनर, बस अशा अवजड वाहनांसाठी प्रतितास ८० किलोमीटर आणि हलक्या वाहनांसाठी प्रतितास १०० किलोमीटरची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

टाळेबंदी शिथिल होताच वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाणही वाढले. त्यामुळे अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) भूषण उपाध्याय यांनी या बेशिस्त वाहनांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार महामार्गावर बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि इंटरसेप्टर वाहनांद्वारे वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या १९ हजार ६४१ वाहनांवर सप्टेंबर महिन्यात कारवाई करण्यात आली.

पळस्पे महामार्ग पोलीस केंद्राने कळंबोली ते खालापूर टोलनाक्यापर्यंत तब्बल १० हजार ११५ वाहनांवर कारवाई केली आहे. ऑगस्ट महिन्यात याच भागांत अवघ्या ७०० वाहनांवर कारवाई झाली होती. त्यापाठोपाठ खंडाळा आणि वडगाव पट्टय़ात वेगमर्यादा उल्लंघन केल्याप्रकरणी ६ हजार ७१९ वाहनांवर (ऑगस्टमध्ये ५,२३१ वाहने) आणि मुंबई-पुणे मार्गावरील बोरघाट व परिसरात २ हजार ८०७ वाहनांवर (ऑगस्टमध्ये ३९४ वाहने) कारवाई करण्यात आली. कारवाईचा संदेश मोबाइलवर जाताच काही चालकांनी दंड भरण्यास सुरुवातही केली आहे.

हलक्या वाहनांचा वेग प्रतितास १६० किलोमीटर

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हलक्या वाहनांसाठी प्रतितास १०० किलोमीटरची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. परंतु काही वाहनांनी याच मार्गावर वाहनांचा वेग तब्बल १६० पर्यंत नेल्याचे पळस्पे केंद्राचे (महामार्ग पोलीस) साहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सांगितले. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या हलक्या वाहनांचे प्रमाण हे ६० ते ६५ टक्के आहे. याव्यतिरिक्त कळंबोली ते खालापूर टोलनाका हद्दीत सीटबेल्ट न लावणे, मोबाइल संभाषण, मार्गिकांचे उल्लंघन, वाहनांना काळ्या काचा बसविल्याप्रकरणी आठ हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.