सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई पालिकेच्या बाजूने निकाल; पाच मजली इमारतीवर हातोडा पडणार

कुलाबा येथे इमारतमालकाने दुरुस्तीसाठी परवानगी घेऊन एक मजली इमारतीच्या जागी उभारण्यात आलेल्या पाच मजली इमारतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिला असून येत्या एक-दोन दिवसांमध्ये या इमारतीवर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.

कुलाबा येथील राजवाडकर स्ट्रीटवरील ‘शनिदेव’ नावाच्या एक मजली इमारतीच्या दुरुस्तीची परवानगी घेण्यात आली होती. प्रत्यक्षात इमारतमालकाने एक मजली इमारतीच्या जागी पाच मजली इमारत उभी केली. पालिकेची परवानगी न घेताच पाच मजले बांधण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने संबंधित मालकावर एमआरटीपीअंतर्गत कारवाई सुरू केली. तसेच २०१४ मध्ये पालिकेने तात्काळ इमारतीचे बांधकाम थांबविण्याची नोटीस विकासकावर बजावली होती. नोटीस बजावली असतानाही विकासकाने इमारतीचे बांधकाम सुरूच ठेवले होते. काम बंद करण्याऐवजी विकासकाने पालिकेच्या नोटीसविरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ‘जैसे थे’चे आदेश दिल्यामुळे पालिकेला आपली कारवाई थांबवावी लागली होती. ‘जैसे थे’ आदेश उठविल्यानंतर पालिकेने या अनधिकृत इमारतीविरुद्ध कारवाई सुरू केली होती. मात्र संबंधितांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे पुन्हा कारवाई थांबविण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांमध्ये या इमारतीवर कारवाई होणार आहे.