करोनाविषयक नियमांबाबत प्रवाशांची बेफिकिरी; १४ दिवसांत ४६१८ जणांवर कारवाई

मुंबई : सर्वसामान्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू होऊन १५ दिवस उलटतात न तोच करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे या रुग्णवाढीचा थेट संबंध लोकल प्रवासाशी जोडला जात आहे. लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे अंतर नियमांचा फज्जा उडत असताना अनेक प्रवासी मुखपट्टी लावण्याच्या नियमाकडेही दुर्लक्ष करत आहेत. गेल्या १५ दिवसांत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १४ हजार ५००हून अधिक रेल्वे प्रवाशांवर विनामुखपट्टी प्रवास करत असल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. मात्र तरीही मुंबईकर याबाबत बेपर्वा आहेत.

सर्वसामान्य प्रवाशांसाठी १ फेब्रुवारीपासून लोकलचे दरवाजे मर्यादित वेळेसाठी उघडण्यात आले. सर्वानाच सकाळी ७च्या आधी आणि दुपारी १२ ते दुपारी ४ आणि रात्री ७ नंतर लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. हा पर्यायही अनेकांनी निवडला असून कार्यालयीन वेळाही त्याप्रमाणे बदलून घेतल्या. त्यामुळे प्रवासी संख्याही काहीशी वाढली आहे. परंतु ही संख्या वाढत असतानाच करोना प्रतिबंध नियमावलीकडे प्रवाशांनी दुर्लक्षच के ले आहे.

अनेक प्रवाशी प्रवासादरम्यान मुखपट्टीचा वापर करीत नसल्याचे आढळले आहे. काही जण हनुवटीवर मुखपट्टी ठेवून सहकारी प्रवाशांसोबत गप्पांच्या फडात सहभागी होताना दिसतात. केवळ प्रवासादरम्यानच नव्हे तर स्थानकात उतरल्यानंतरही ही मंडळी मुखपट्टीचा वापर करीत नाहीत. करोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. यामुळे मुखपट्टीचा वापर करून खबरदारी घेणाऱ्या प्रवाशांचे मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्यांशी वाद होत आहेत.

विनामुखपट्टी प्रवास करणाऱ्यांबाबत मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनीही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून पादचारी पूल, फलाट, स्थानकांची प्रवेशद्वारे येथे पालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पश्चिम व मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकात १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत एकूण चार हजार ६१८ मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक दोन हजार ५५८ प्रवाशांचा, तर मध्य रेल्वेवरील २,०६० प्रवाशांचा त्यात समावेश आहे. त्यापैकी पश्चिम रेल्वेवर कारवाई करण्यात आलेले ५७१ प्रवासी पहिल्याच दिवशी सापडले होते.  दोन्ही मार्गावरील मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून साडेचार लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

प्रवासी संख्येत वाढ

१ फेब्रुवारीपासून सामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास खुला झाला. पश्चिम रेल्वेवर सध्याच्या घडीला दररोज १७ लाख ५९ हजार १२३ प्रवासी प्रवास करीत असून मध्य रेल्वेवरील प्रवाशांची संख्या २१ लाखांवर पोहोचली आहे. टाळेबंदीआधी या दोन्ही मार्गावरून दररोज ८० लाखांहून अधिक  प्रवासी दररोज प्रवास करीत होते.

मुखपट्टी विना प्रवास

१७१५ सीएसएमटी

१३३ कुर्ला

९०  कल्याण