मुंबई : पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्रासंदर्भात बातमी देताना वृत्तवाहिन्यांनी कोणतीही शहानिशा न करता आपल्या छायाचित्राचा वापर केल्याबद्दल अभिनेता उमेश कामत याने समाजमाध्यमांवरून संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी संबंधित वृत्तवाहिन्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्याने दिला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुं द्रा याला पॉर्न फिल्म तयार करून ती अ‍ॅपवर प्रसारित के ल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. कुंद्रा सध्या पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान कुं द्रा आणि त्याचा माजी सहाय्यक उमेश कामत यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद समोर आले आहेत. या संदर्भातील वृत्त प्रसारित करताना संशयित आरोपी उमेश कामत म्हणून काही वृत्तवाहिन्यांनी अभिनेता उमेश कामतच्या छायाचित्राचा वापर के ला. ही बेजबाबदार पत्रकारिता असल्याचे स्पष्ट करत अभिनेता उमेशने समाजमाध्यमांवरून संताप व्यक्त केला.

राज कुंद्रा प्रकरणी चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये या प्रकरणातील एक आरोपी ‘उमेश कामत’ याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कु ठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी के ली आहे’, अशा शब्दांत त्याने समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त के ली आहे.  ‘या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल. या प्रकरणी मी योग्य ती कारवाई निश्चितच करेन,’ असेही त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, अमृता खानविलकर, प्रियदर्शन जाधव, जितेंद्र जोशी, अमृता सुभाष यांच्यासह अन्य कलाकारांनीही उमेशला पाठिंबा दिला आहे.