‘कारा’च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा अडसर
निराधार बालकांना मायेची ऊब आणि घरपण मिळवून देण्यासाठी दत्तकविधान करणाऱ्या संस्थांसाठी केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या ‘कारा’ (सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथॉरिटी) ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. निराधार मुलांना पालक शोधण्याचे किंवा दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांचे काम ‘ऑनलाइन’ करण्यात आल्याने मोठाच गोंधळ उडाला आहे. वैयक्तिक समुपदेशन, चर्चा याऐवजी संगणकावरून हे सर्व काम करणे अशक्य असून, त्यास दत्तकविधानाचे कार्य करणाऱ्या राज्यातील संस्थांच्या फेडरेशनने विरोध केला आहे. त्यामुळे दत्तकविधानाचे काम खडतर होईल, अशी भूमिका काही संस्थांनी घेतली आहे.
राज्यात ‘कारा’ मान्यताप्राप्त ३१ संस्था असून निराधार बालकांच्या दत्तकविधानाचे काम त्यांच्यामार्फत केले जाते. या संस्थांसाठी ‘कारा’ची मार्गदर्शक तत्त्वे बंधनकारक असतात. निराधार बालक किती वर्षांचे आहे, त्यामध्ये कोणते व्यंग आहे का, त्याचे शिक्षण, सवयी, कौशल्य यासह इत्यंभूत माहिती संस्थेकडे असते. ज्यांना मूल दत्तक घ्यायचे असते, त्यांनी संस्थेशी संपर्क साधल्यावर पालकांची कौटुंबिक पाश्र्वभूमी, सांपत्तिक स्थिती, शिक्षण, दत्तक पाल्याचे संगोपन ते प्रेमाने करू शकतील की नाही, त्यांना मुलगा की मुलगी दत्तक हवी आहे, कोणत्या वयोगटातील हवे आहे, आदी सर्व तपशील संस्थेकडून तपासला जातो.