शैलजा तिवले

राज्यातील ८० टक्के ऑक्सिजन उत्पादक आणि विक्रेते हे कोकण आणि पुणे विभागात आहेत.  राज्यभरातील ऑक्सिजनची मागणी अचानक वाढल्याने त्यांच्याकडे पुरेसा ऑक्सिजनचा साठा असला तरी मर्यादित वाहतूक व्यवस्थेमुळे वितरणात अडचणी येत असून विलंब होत आहे.

राज्यात अनेक जिल्ह्य़ांमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. मात्र त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने तुटवडा भासत आहे.

मर्यादित वाहतूक व्यवस्था

राज्यात ऑक्सिजनचे २४ उत्पादक आणि ६६ विक्रेते आहेत. असे एकत्रित ९० जणांकडून ऑक्सिजनचा राज्यभरात पुरवठा करण्यात येतो. यातील ८० टक्के हे कोकण आणि पुणे विभागात आहेत. विक्रेते या उत्पादकांकडूनच ऑक्सिजन खरेदी करून वितरण करतात. राज्यभरात ऑक्सिजनची मागणी वाढली असली तरी वितरणासाठी वाहतूक व्यवस्था उत्पादक आणि विक्रेते मर्यादित आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा साठा शिल्लक असला तरी मागणीच्या प्रमाणात पुरवठा करण्यात अडचणी येत असल्याचे काही उत्पादकांनी सांगितले.

वाडा, भिंवडी, पालघर या ठिकाणी दरदिवशी सुमारे पाच ते सहा हजार घनमीटर ऑक्सिजनचा पुरवठा करतो. चाकणहून ऑक्सिजनच गेल्या काही दिवसांपासून मिळत नसल्याने मोठय़ा प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. परवा तर मालच न आल्याने दिवसभर व्यवसाय बंद ठेवावा लागला. तसेच दरही दुप्पट वाढले आहेत. पूर्वी जवळपास १२ रुपये प्रतिघनमीटर दराने मिळत होता. परंतु गेल्या महिन्यापासून हेच दर २५ रुपयांवर पोहचले असल्याची माहिती वितरकाने दिली.

तुटवडा नाही

राज्यात दरदिवशी १ हजार १२ टन ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. सध्याची ऑक्सिजनची आवश्यकता ८७० मेट्रिक टन आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. याउलट दरदिवशी पुढील दोन ते तीन दिवस पुरेल इतका साठा दरदिवशी शिल्लक असतो, असे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले.

राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने ऑक्सिजनचे दर १७.४९ रुपये प्रति घनमीटर निश्चित केले आहेत. तेव्हा यापेक्षा अधिक दराने विक्री करत असल्यास कायद्याने गुन्हा आहे.

राज्यातील ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. पण गरज भासली तर औद्योगिक वापराचा ऑक्सिजनपुरवठा शून्यावर आणला जाईल. राज्यातील ऑक्सिजन साठा पुरेसा आहे. १७ हजार ७५३ जंबो सिलिंडर, बी-टाइपचे १५ हजार ४७३ सिलिंडर तसेच २३० डुरा सिलिंडर आहेत. १४ ठिकाणी द्रवरूप ऑक्सिजनच्या टाक्या आहेत, तर १६ ठिकाणी काम सुरू आहे. येत्या काळात पुणे येथे नवी कंपनी सुरू करण्याच्या हालचाली सुरू असून ऑक्सिजन पुरवठादारांची यादी सरकारकडे आहे.

– राजेश टोपे, आरोग्यमंत्री