आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला बळ देण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी ते ‘जन आशीर्वाद’ यात्रा काढणार आहेत. येत्या शुक्रवारपासून कोल्हापुरातून अंबाबाईचे दर्शन घेऊन ते या यात्रेला सुरुवात करणार आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ ऑगस्टपासून ‘विकास रथयात्रा’ काढणार असल्याचे जाहीर केले आहे.

”जन आशीर्वाद’ यात्रेद्वारे महाराष्ट्रातील ज्या जनतेने आम्हाला मतं दिली त्यांचे आपण आभार मानणार आहोत तर ज्यांनी मतं दिली नाहीत त्यांची मन जिंकणार आहोत,’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. विधानसभेसाठी आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. तसेच ते शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असतील अशी चर्चाही यापूर्वी रंगली होती. या पार्श्वभूमीवर आदित्य यांच्या या यात्रेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपण १ ऑगस्टपासून ‘विकास रथयात्रा’ काढणार असल्याची घोषणा केली होती. ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ आणि ‘अब की बार २२० पार’ या टॅगलाईनखाली ही रथयात्रा काढण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक मतदारसंघातून ही रथयात्रा जाणार आहे.

निवडणुकांपूर्वी रथयात्रेचे आयोजन करण्याची भाजपामध्ये प्रथा आहेच. यापूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी अनेकदा रथयात्रा काढल्या आहेत. आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकत राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रा काढण्यात येणार आहे.

येत्या ऑक्टोबर महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयारीसाठी अवघे तीनच महिने शिल्लक असल्याने आता सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात होईल. यामध्ये शिवसेनेने मात्र जन आशीर्वाद यात्रेद्वारे आघाडी घेतली आहे.