मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या पंचवीस टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया ९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. प्रवेशाची सोडत ५ मार्च रोजी काढण्यात येणार आहे.

पूर्वप्राथमिक आणि पहिलीसाठी पंचवीस टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्यात येते. गेल्या वर्षीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना पुढील शैक्षणिक वर्षांची प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारीत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्ष नियमित वेळापत्रकानुसार सुरू होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. येत्या ९ फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

एकच फेरी

यंदा एकाच प्रवेश फेरीचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या फेरीची सोडत निघाल्यावर रिक्त राहिलेल्या जागांवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश देण्यात येतील. चार टप्प्यांत प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश देण्यात येतील. अर्ज भरण्याची प्रक्रिया ९ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून २६ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. पहिली सोडत ५ मार्च रोजी काढण्यात येईल. सोडतीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ९ ते २६ मार्च दरम्यान पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. प्रतीक्षा यादीतील पहिल्या टप्प्यातील प्रवेश २७ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश १२ ते १९ एप्रिल दरम्यान, प्रतीक्षा यादीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश २६ एप्रिल ते ३ मे दरम्यान तर चौथ्या टप्प्यातील प्रवेश १० ते १५ मे दरम्यान होणार आहेत.

प्रतिसाद वाढला

अनेक विद्यार्थी प्रवेशाविना असले तरीही यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. जवळपास ८३ हजार विद्यार्थ्यांनी पंचवीस टक्के राखीव जागांवर प्रवेश घेतला. टाळेबंदीमुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी, शाळांचे वाढलेले शुल्क यांमुळे यंदा शहरी भागांमध्येही पंचवीस टक्क्यांवरील प्रवेशासाठी प्रतिसाद वाढला.

वर्षभर प्रवेश

गेल्या वर्षी (शैक्षणिक वर्ष २०२०—२१) प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये सुरू झाली. मात्र, त्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदी यांमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे प्रवेश प्रक्रियाही रखडली. जवळपास ६ वेळा प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. नुकतीच शेवटची संधी देण्यात आली. मात्र, अद्यापही अर्ज केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकले नाहीत.