सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निवाडा येईपर्यंत महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भाग केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीनंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबई केंद्रशासित करा, असे विधान केले. त्यावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सावदी यांच्या विधानाशी सहमत आहात का, असा सवाल काँग्रेस व राष्ट्रवादीने राज्यातील भाजप नेत्यांना केला.

‘मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि राहील’, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ठणकावले.

मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करावा, अशी सीमा भागातील जनतेची मागणी असून तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित घोषित करावे, या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांच्या विधानाचा काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध केला आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित करण्याचा भाजपचा कुटिल डाव उघड झाला आहे; परंतु भाजपने मुंबईकडे वाकडय़ा नजरेने पाहिले तर महाराष्ट्रात राजकारण करणे त्यांना महागात पडेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला आहे.

मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेली मागणी भाजपला मान्य आहे का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सवादी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. मुंबईतील व महाराष्ट्रातील भाजपचे नेते याबाबत मूग गिळून गप्प का बसले आहेत, असा सवालही त्यांनी केला.