राज्यातही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संबंधांवर परिणाम ?
राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीत कटुता निर्माण झाल्यावर काँग्रेसचे अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे दोन पटेल एकत्र येऊन मार्ग काढीत असत व हे वर्षांनुवर्षे सुरू होते. गुजरात राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ऐनवेळी अहमद पटेल यांना ‘हात’ दाखविल्याने दोन पटेलांच्या संबंधात कटुता निर्माण झाली आहे. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार पटेल यांनाच राष्ट्रवादीने डिवचल्याने त्याचे साहजिकच परिणाम राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संबंधांवर होण्याच चिन्हे आहेत.
राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन मतांना महत्त्व आले होते. राष्ट्रवादीने काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी एक मत देण्याचे जाहीर करून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्यक्षात राष्ट्रवादीचे एकही मत मिळालेले नाही, असा काँग्रेसचा दावा आहे. राष्ट्रवादीने मात्र एक मत दिल्याचे स्पष्ट केले आहे. अहमद पटेल यांना निसटता विजय मिळाला असला तरी त्यातून राष्ट्रवादीबरोबरील संबंधांबाबत काँग्रेस नेतृत्वाच्या मनात अढी निर्माण झाली आहे. आतापर्यंत प्रफुल्ल पटेल यांच्या कलाने अहमद पटेल यांनी घेतले होते. तरीही राष्ट्रवादीने ऐनवेळी दगा दिल्याची काँग्रेस नेत्यांची भावना आहे.
राष्ट्रवादीच्या भूमिकेवरून सोनिया गांधी आणि अहमद पटेल हे संतप्त झाल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले. केंद्रात व राज्यात सत्ता असताना प्रत्येक वेळी राष्ट्रवादीच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. राज्यात प्रत्येक वेळी राष्ट्रवादीच्या कलाने घेण्यात आले. तरीही राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घेतल्याने काँग्रेसचे नेतृत्व नाराज झाले आहे.
भाजपचा सामना करण्याकरिता महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याची आवश्यकता दोन्ही पक्षांतील नेत्यांची भावना आहे. मतविभाजनाचा भाजपलाच फायदा होतो. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात इंदिरा गांधी की शरद पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव आधी मांडायचा यावरून वाद निर्माण झाला असता काँग्रेसने माघार घेत पवारांचा ठराव आधी मांडण्यास मान्यता दिली होती. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला राष्ट्रवादीने डिवचल्याने काँग्रेस नेते दिल्लीत तरी राष्ट्रवादीबाबत सौम्य भूमिका घेणार नाही हे स्पष्टच आहे.
आतापर्यंत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे सचिव अहमद पटेल हे राष्ट्रवादीबाबत नरमाईची भूमिका घेत आणि मित्र पक्षाचा सन्मान करीत. उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मनात राष्ट्रवादीबद्दल अढी असून ती लपून राहिलेली नाही. काँग्रेसला गरज असल्याने राष्ट्रवादीच्या कलाने घेण्यात आले आहे.
राष्ट्रवादीने एक मत देण्याचे जाहीर केले होत व त्यानुसार मतदान केले. काँग्रेसला स्वत:चे आमदार सांभाळता आले नाहीत. राष्ट्रवादीवर खापर फोडण्याऐवजी आधी पक्षाचे घर सुस्थितीत राहिल याची खबरदारी घ्यावी. – सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष.