‘भारतमाता की जय’वरून एमआयएमच्या आमदाराचे निलंबन
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरू असतानाच, ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार देणाऱ्या मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाचे नेते असदुद्दिन ओवेसी यांच्या भूमिकेचे तीव्र पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. ओवेसी यांच्या भूमिकेची री ओढल्याने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांना लक्ष्य केले. त्यामुळे विधानसभेच्या कामकाजाला बुधवारी धर्मयुद्धाचेच स्वरूप आले. भाजपच्या आमदारांनी एमआयएम आमदारांच्या आसनासमोरच घोषणाबाजी करत गोंधळ घातला. या गोंधळात पठाण यांना अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात आले.

राज्य सरकारने स्मारकांवर खर्च करण्याऐवजी हा निधी रुग्णालये उभारण्यासाठी वापरावा, अशी सूचना एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी करताच सत्ताधारी युतीच्या सदस्यांनी त्यास आक्षेप घेतला. ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार देणाऱ्यांकडून नेत्यांच्या स्मारकाला विरोध केला जात असल्याचा मुद्दा भाजपचे आमदार राम कदम यांनी उपस्थित केला. त्यावरून सभागृहात गोंधळ सुरू झाला. ‘भारतमाता की जय’ म्हणण्याची घटनेमध्ये तरतूद नाही याकडे एमआयएमचे दुसरे आमदार वारिस पठाण यांनी लक्ष वेधले. पठाण यांच्या वक्तव्यावरून गदारोळ वाढत गेला. पठाण यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी सुरू केली. गोंधळामुळे कामकाज तहकूब करण्यात आले असता भाजपचे आशीष शेलार, मेधा कुलकर्णी आदी सदस्यांनी जलील आणि पठाण यांच्या आसनासमोर उभे राहून ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. थोडय़ाच वेळात भाजपच्या अन्य आमदारांनी या दोन्ही आमदारांना घेरले. शेलार तर कमालीचे संतप्त झाले होते. वातावरण कमालीचे तापले असताना एमआयएमच्या दोन्ही सदस्यांनी संयम बाळगल्याने पुढील अनर्थ टळला. या दोघांकडून काही प्रतिक्रिया व्यक्त केली गेली असती तर सभागृहात हाणामारीच झाली असती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, भास्कर जाधव यांनी भाजप आमदारांना आवरण्याचा प्रयत्न केला. शेवटी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपच्या आमदारांना मागे खेचले. दरम्यान, पठाण यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विखे-पाटील, भास्कर जाधव, आशीष शेलार व गुलाबराव पाटील यांनी केली. तर देशविघातक शक्ती या सभागृहामध्ये खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा खडसे यांनी दिला. ओवेसी यांच्या जहाल वक्तव्याने सारा अल्पसंख्याक समाज लक्ष्य होऊ नये, अशी अपेक्षा काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली. त्यानंतर अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली भारतमातेबद्दल अनादर व्यक्त केल्याबद्दल वारिस पठाण यांचे सदस्यत्व अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात यावे, असा ठराव संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मांडला आणि सभागृहाने तो मंजूर केला. निलंबनाच्या निर्णयाविरोधात राज्यभरात रान उठविण्याचा निर्णय एमआयएमने घेतला आहे. दरम्यान, ही घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया असदुद्दिन ओवेसी यांनी व्यक्त केली आहे.

राम कदम यांची घोषणाबाजी
इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका विधिमंडळ आवारातील मंडपात पत्रकारांसमोर मांडली. त्यानंतर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत असताना आमदार राम कदम व अन्य कार्यकर्त्यांंनी ‘भारत में रहना होगा, वंदे मातरम कहना होगा,’ अशा घोषणा दिल्या. प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जलील यांना गराडा घातला होता. कदम यांनी घोषणाबाजी सुरू केल्यावर सर्वानी तेथे गर्दी केली. वारिस पठाण यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. आपल्याला बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही, असे सांगून त्यांनी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना विधानभवनातील सुरक्षा रक्षकांनी गराडा घातला होता.

* पठाण यांच्यावरील कारवाईविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा विचार असून आदेशाची प्रत मिळाल्यावर निर्णय घेतला जाईल, असे आमदार जलील यांनी सांगितले
* विधिमंडळात बहुमताच्या जोरावर कोणतेही निर्णय घेतला जाऊ शकतो. ‘मी कुडता का घातला नाही, शर्ट-पँट का घातली,’ यावरूनही निलंबित करतील. पण देशाच्या राज्य-घटनेबद्दल आम्हाला आदर असून न्याययंत्रणेवर विश्वास आहे, असे जलील यांनी सांगितले.

जन गण मन’ या राष्ट्रगीताबद्दल आदरच असून देशाबद्दल अभिमानच आहे. परंतु कोणी जबरदस्तीने ‘भारतमाता की जय’ असे म्हणण्यास भाग पाडत असेल, तर ते सहन करणार नाही. मला बाजू मांडण्याची संधी न देता निलंबित करण्यात आले. माझ्यावर करण्यात आलेली कारवाई अन्याय्य आहे.
– वारिस पठाण, एमआयएमचे आमदार