अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि त्यामधील पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा कथित सहभाग यावर मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची बदली केल्याचं जाहीर केलं. विरोधकांनी या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणावर गदारोळ केल्यानंतर बदलीची घोषणा आली असली, तरी अजित पवारांनी बदली नेमकी का केली? याचं कारण सांगितलं आहे. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

“सकाळी फडणवीस आणि शेलार भेटायला आले होते”

सचिन वाझे प्रकरणी स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले, “हाऊसमध्ये आज भरपूर कामकाज होतं. ते सगळं वेळेवर होणं आवश्यक होतं. सकाळी १० वाजता मी हाऊसमध्ये आल्यानंतर मला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार भेटले आणि सचिन वाझेंना बाजूला केल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही असं म्हणाले. कामकाज चालू देण्यासाठी कधीकधी राज्यकर्त्यांना सामंजस्याची भूमिका घ्यावी लागते. त्यामुळे अनिल देशमुखांना त्यासंदर्भात घोषणा करायला सांगितली. शेवटच्या दिवशी अनेक मागण्या, उत्तरं द्यायची असतात. या गोष्टी नीटनेटकेपणाने व्हाव्यात, यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलून आम्ही हा निर्णय घेतला.”

वीज कनेक्शन तोडणीवरची स्थगिती का उठवली?

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी अधिवेशनादरम्यान जाहीर केलेली वीज कनेक्शन तोडणीवरची स्थगिती उठवण्यामागचं कारण जाहीर केलं. “१० दिवसांचच अधिवेशन होतं. अधिवेशन व्यवस्थित पार पडावं हा आमचा हेतू होता. त्यावेळी ऊर्जामंत्री बाहेर गेले होते. म्हणून मी सरकारच्या वतीने निवेदन करण्याचं जाहीर केलं होतं. आपण तोपर्यंत स्थगिती दिली होती. आता महावितरण कंपनीवर आर्थिक बोजा वाढू लागला आहे. या परिस्थितीत ती कंपनी कशी चालेल? असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून राज्य सरकारने ४५ हजार कोटींच्या थकबाकीमध्ये ३० हजार कोटींची माफी दिली आणि फक्त १५ हजार कोटींची थकबाकी भरली जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे नाईलाजास्तव सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे”, असं अजित पवार म्हणाले.