News Flash

“करोना म्हटला असेल कुठं जाकिटातून आत शिरू, म्हणून दरेकरांना करोना नसेल झाला”, अजित पवारांची टोलेबाजी!

करोनासंदर्भात विधिमंडळाचं वरीष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेत अजित पवारांनी माहिती सांगताना केलेली टोलेबाजी दोन्ही बाजूच्या आमदारांची दाद मिळवून गेली.

राज्यात करोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे सगळ्यांसाठीच तो चिंतेचा विषय ठरला आहे. दरम्यान, याविषयी राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणात देखील उल्लेख केला होता. त्यावर बोलताना विधिमंडळाचं वरीष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेमध्ये गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन दिलं. यावेळी बोलताना त्यांनी करोनाची सविस्तर आकडेवारी आणि राज्य सरकारकडून यासंदर्भात केलेल्या आणि केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी अजित पवारांची राजकीय टोलेबाजी पुन्हा ऐकायला मिळाली. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना करोना झाला नसल्याचं सांगतानाच दरेकरांच्या जाकिटमुळेच त्यांना करोना झाला नसेल असं अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला!

“एका गोष्टीचं मला विशेष वाटतं…!”

राज्यातल्या करोनाच्या परिस्थितीविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, “राज्यातला मृत्यूदर सुदैवाने घटला आहे. करोना झाला तर बऱ्याच लोकांना हॉस्पिटलला जावं देखील लागत नाही. बरेच जण घरच्या घरी औषधं घेऊन बरे होत आहेत. आज देखील आमच्या मंत्रिमंडळातले ७ ते ८ मंत्री आणि दोन्ही बाजूचे काही मान्यवर आमदार करोनाग्रस्त आहेत”. अजित पवार पुढे म्हणाले, “एका गोष्टीचं मला विशेष वाटतं की मुख्यमंत्र्यांना, प्रवीण दरेकरांना आणि सभापती महोदयांना करोना नाही झाला. विधानसभेत मलाही झाला, फडणवीसांनाही झाला. तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे तुम्हाला झाला नसेल. किंवा त्यांचं (प्रवीण दरेकर) जाकिट बघून तो जवळ गेलाच नसेल, म्हटला असेल कुठं जाकिटातून आत शिरायचं असंही काही झालं असेल तर माहीत नाही”, असं अजितदादा म्हणाले आणि दोन्ही बाजूकडून या कोटीला खळखळून दाद मिळाली.

“..नाहीतर माझ्या नावावर पावती फाडू नका!”

“पण तुम्हा तिघांनाही करोना होऊ नये अशा आमच्या शुभेच्छा असतील. नाहीतर उद्या करोना झाला तर म्हणतील तुझीच दृष्ट लागली आणि म्हणून करोना झाला, असं म्हणून माझ्या नावावर पावती फाडू नका”, असं म्हणत अजित पवारांनी टोमणा मारला. तितक्यात मागून एका सदस्याने ‘प्रसाद लाड यांनी ज्यांना ज्यांना जॅकेट दिलं, त्यांना करोना झाल्याचं’ म्हणताच अजित पवारांनी “प्रसादने (भाजपा आमदार) मलाही जॅकेट दिलं होतं”, असं म्हणत सूचक इशारा केला आणि सभागृहात पुन्हा हशा पिकला.

“जर सरकारमध्ये खरंच नैतिकता असेल, तर…”, देवेंद्र फडणवीस विधानसभेत आक्रमक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 2:33 pm

Web Title: ajit pawar in assembly budget session on corona mocks pravin darekar pmw 88
Next Stories
1 “जर सरकारमध्ये खरंच नैतिकता असेल, तर…”, देवेंद्र फडणवीस विधानसभेत आक्रमक
2 खवय्यांसाठी वाईट बातमी! मनसेच्या इशाऱ्यानंतर कराची बेकरीची मुंबईमधून एक्झिट
3 १९ स्थानकांच्या विकासाची रखडपट्टी
Just Now!
X