राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांचे जावई आणि सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांच्या मनधरणीनंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.

सदानंद सुळे यांनी मंगळवारी सकाळी अजित पवारांची हॉटेल ट्रायडंट येथे भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यामध्ये नक्की काय चर्चा झाली हे कळू शकलेले नाही. मात्र, राजीनामा देण्यापूर्वी अजित पवार यांची सुळे यांच्याशी भेट झाली होती. त्यानंतरच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी देखील अजित पवारांना समजावण्याचा प्रयत्न केला, असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते अजित पवारांचे मन वळवण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना यश येत नव्हते. यामध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील या महत्वाच्या नेत्यांचा समावेश होता. जेव्हा वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्नातूनही अजित पवारांना आवरता येत नाही हे लक्षात आल्यानंतर पवार कुटुंबियांनी आज सकाळी अजित पवारांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर हाच प्रयत्न यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळी सुप्रीम कोर्टाने बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वेगाने घडामोडी घडल्या आणि अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगत त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. तत्पूर्वी शपथविधीवेळी त्यांच्यासोबत असणारे एकएक करुन बहुतांश आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतले होते.