राज्यातील सिंचन घोटाळाप्रकरणी नेमण्यात आलेल्या माधवराव चितळे समितीने लोकांकडून आलेल्या तक्रारी स्वीकारून प्रामाणिकपणे चौकशी केल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री सुनील तटकरे हे दोघेही महाराष्ट्रातील लालूप्रसाद यादव बनून तुरुंगात जातील, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ‘कमिशन ऑफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट’अंतर्गत विशिष्ट मुदतीत ‘आदर्श’चा अहवाल विधिमंडळाला सादर न करण्यात आल्यामुळे सरकार बरखास्त करावे अशी मागणी आपण राज्यपालांकडे केल्याचेही तावडे यांनी सांगितले.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी आपल्याकडील पुरावे १८ ऑक्टोबरला चितळे समितीला सादर करणार असून यात गोसीखुर्द व गोदावरीसह अनेक ठिकाणी निविदा न काढता दिलेली टेंडर तसेच वाढीव दराच्या निविदांची माहिती सादर करणार असल्याच विनोद तावडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.