‘मला अटक झाली तर महाराष्ट्र पेटेल..’ काही वर्षांपूर्वी राज यांना अटक करण्याची तयारी सरकारने केली तेव्हा राज यांनी हे उद्गार काढले आणि शब्दश: मनसेच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाचा आगडोंब महाराष्ट्रात उसळला.. मराठी पाटय़ा, अमिताभ-जया विरोधापासून टोलपर्यंतची राज यांची सारीच आंदोलने नावीन्यपूर्ण राहिली. बुधवारी टोलविरोधात राज्यातील महामार्ग बंदचे राज यांचे आंदोलनही असाच झटका देणारे खणखणीत आंदोलन ठरणार आहे. राज्यातील सर्व महामार्गावर मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वत:चीच वाहने रस्त्यामध्ये लावून निघून जाणार असल्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडणार आहे.
पुण्याची सभा होण्यापूर्वीच टोलविरोधातील राज्यव्यापी आंदोलनाचे सारे नाटय़ राज यांनी तयार केले होते. राज यांच्या यशस्वी आंदोलनाचा धसका सरकारपेक्षा शिवसेनेलाच अधिक असल्यामुळे सेना नेत्यांनी या ‘नाटका’च्या नेपथ्यापासून रंगभूमीपर्यंतची सारी माहिती मुखपत्रातून मांडली. शाहरुख खानविरोधी आंदोलन असो की राहुल गांधी यांच्या मुंबई भेटीच्या वेळचे आंदोलन असो, शिवसेनेची या दोन्ही आंदोलनात पुरती फसगत झाली होती. राहुल गांधींनी तर मुंबईत येऊन गुंगारा दिला आणि शिवसेनेचे ‘नाटक’ साफ पडले. या पाश्र्वभूमीवर उद्याचे राज यांचे आंदोलन यशस्वी झाल्यास पुन्हा मनसेची हवा होईल, ही सेनेची खरी भीती असल्याचे मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर सकाळी शेकडो गाडय़ा येऊन उभ्या राहातील व गाडीचे चालक रस्त्यातच गाडीची चावी काढून निघून जातील. राज्यातील सर्व महामार्गावर अशाच प्रकारे ट्रक व गाडय़ा उभ्या केल्या जाणार असून, काही ठिकाणी रस्त्यावर डेब्रीज टाकण्यासह वेगवेगळे प्रयोग ‘मनसे’ केले जाणार आहेत. या आंदोलनाबाबत राज यांनी कमालीची गुप्तता पाळली होती. अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांना शेवटच्या क्षणी नेमके आंदोलन कसे करायचे याची कल्पना देण्यात आली होती, तर सर्व संपर्क अध्यक्षांना आंदोलनासाठी कोणती तयारी करायची एवढेच सांगण्यात आले होते. पोलिसांकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड आदल्या रात्रीच होणार हे लक्षात घेऊन सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना भूमिगत होण्याचे आदेश देण्यात आले. महामार्गालगत गाडय़ा व ट्रक रात्रीच उभे करून ठेवण्यास सांगण्यात आले असून, कोणीही कार्यकर्ता गाडी घेऊन रस्त्यावर नेऊन सोडेल अशी अभिनव योजना करण्यात आली आहे. महामार्गावर उभ्या राहणाऱ्या शेकडो गाडय़ा हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यासाठी गाडय़ा उचलणाऱ्या पुरेशा गाडय़ाच पोलिसांकडे नसल्यामुळे राज यांच्याच म्हणण्याप्रमाणे आंदोलन खणखणीत होणार आहे.
राज ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा
सोमवारपासूनच मनसे कार्यकर्त्यांना कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक नोटिसा पाठविण्यास पोलिसांनी सुरुवात केली. मंगळवारी सकाळी शिवाजी पार्क पोलिसांनीही राज ठाकरे यांना ही प्रतिबंधात्मक नोटीस पाठवली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा आणणारे कुठलेही कृत्य करू नये, तसेच समर्थकांस चिथावणी देऊ नये, असे निर्देश या नोटिशीत देण्यात आले आहेत.
राज्यभर पावणेदोन लाख  पोलीस तैनात, सुटय़ा रद्द
संपूर्ण राज्यभर १ लाख ८० हजार अतिरिक्त पोलिसांची कुमक तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती यांनी दिली. हे आंदोलन पोलिसांसमोर आव्हान असून मुंबईतील सर्व पोलिसांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत, असे मुंबईचे प्रभारी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.
कमी खर्चाच्या प्रकल्पांना टोलमुक्ती?
टोलविरोधाचे लोण राज्यभरात पसरल्यानंतर राज्य सरकारने आता २५ कोटी रुपयांहून कमी खर्चाचे प्रकल्प टोलमुक्त करण्याचा विचार सुरू केला आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच होण्याची अपेक्षा आहे. मात्र श्रेयाच्या वादात नवीन टोलधोरण लटकण्याची शक्यता आहे.
राज वाशीला की मुलुंडला?
वाशी टोलनाक्यावर आपण आंदोलनाचे नेतृत्व करणार आहोत, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले असले तरी ते मुलुंड चेकनाक्यावर धडक देतील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.