मुंबईत येत्या ५ ऑगस्टपासून सर्व दुकानं सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत खुली राहणार आहेत. करोना आणि लॉकडाउनमुळे दुकानं उघडण्याची वेळ ही याआधी कमी होती. तसंच ऑड इव्हन तत्त्वावर ही दुकानं सुरु होती. मात्र आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत ५ ऑगस्टपासून मुंबईतली सर्व दुकानं ही सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत खुली राहणार आहेत. लॉकडाउनच्या काळात मुंबईकरांना काहीसा दिलासा देणारीच ही बातमी ठरली आहे.

मुंबईतील सर्व दुकाने, बाजार हे परवापासून म्हणजेच ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत सुरु असणार आहेत. यामध्ये मद्य विक्रीच्या दुकानांचाही समावेश आहे. एवढंच नाही तर मद्य हे घरपोचही देता येणार आहे. केंद्राने दिलेल्या आदेशांनुसार आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. कोणत्याही नियमाचा भंग केला तर कारवाई केली जाणार आहे. मॉल्स आणि कॉम्प्लेक्समधली दुकानंही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. मॉलमधली सिनेमागृहं बंद राहणार, फूड कोर्ट, रेस्तराँ, हॉटेल्स या सगळ्यांना होम डिलिव्हरीची संमती देण्यात आली आहे.

सलून, स्पा, ब्युटी पार्लर्स यांना २३ जून २०२० च्या आदेशानुसार संमती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मैदानी खेळ जसे की गोल्फ, आऊटडोअर फायरिंग रेंज, ओपन एअर जिम, आऊट डोअर बॅडमिंटन, मल्लखांब यांनाही संमती देण्यात आली आहे. स्विमिंग पूल बंदच राहणार आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.