कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौरपद मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सर्व प्रयत्न करेल. आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक मुंबईमध्ये झाली. त्यानंतर दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले, कल्याण-डोंबिवलीमध्ये आम्ही ४२ जागांवर जिंकलो आहोत. तिथे संघर्ष समितीने ९ जागा जिंकल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आमच्याकडे सध्या ५१ जागा आहेत. त्यामुळे महापौरपद मिळवण्यासाठी आम्ही निसर्ग नियम पाळून सर्व प्रयत्न करू. त्यासाठी आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत. मी आज संध्याकाळीच कल्याणला जाणार असल्याचेही दानवे यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौरपद मिळवण्यासाठी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज नाही, असे स्पष्ट करून मित्रपक्ष शिवसेना आणि आमच्यामध्ये आता कोणतीही कटुता नसल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत आमची ताकद पाच पटीने वाढली आहे. त्यामुळे स्वबळावर लढल्याचा पक्षाला फायदाच झाला, असे सांगून पुढील काळातही स्थानिक नेतृत्त्वाची स्वबळावर लढण्याची इच्छा असेल, तर त्याच पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाऊ, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेसोबत युती करण्यावर काहीही विचार करण्यात आलेला नसून, योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.