देशातील असंख्य दुकानदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘रिटेलर असोसिएशन ऑफ इंडिया’च्या एका शिष्टमंडळाने पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन राज्यातील मॉल आणि व्यापारी संकुले सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली.

व्यापारी संकुले आणि मॉल्स अत्यंत काळजीपूर्वक व नियोजनबद्ध पद्धतीने कसे उघडता येतील, या मुद्दय़ावर शिष्टमंडळाने आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. ठाकरे यांनी असोसिएशनच्या मागण्या रास्त असल्याचे मत व्यक्त केले.

सामाजिक अंतराचे निर्बंध कसोशीने पाळण्याची तयारी दाखवत सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत मॉल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती संघटनेकडून करण्यात आली.

भारतातला रिटेल उद्योग अंदाजे चार कोटी ६० लाख व्यक्तींना रोजगार पुरवतो. तसेच दैनंदिन वापरावर होणाऱ्या खर्चात ४० टक्के हिस्सा या उद्योगाचा आहे. देशाच्या ठोक राष्ट्रीय उत्पन्नापैकी दहा टक्के उत्पन्न हे रिटेल उद्योगातून मिळते. करोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने उघडण्यात आल्यानंतरही अनेक ग्राहक आजही खरेदी करण्यासाठी कचरत आहेत. या ग्राहकांना पुन्हा आत्मविश्वासाने खरेदी करता यावी, यासाठी रिटेलर असोसिएशन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सध्याच्या काळात मागणीतली अस्थिरता पाहता दुकाने अधिक काळ व आठवडय़ाचे सर्व दिवस सुरू ठेवण्यात यावीत, अशीही रिटेलर असोसिएशनची आग्रही भूमिका आहे.

ठाकरे यांच्या भेटीनंतर रिटेलर असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी ही बैठक अत्यंत माहितीपूर्ण झाल्याचे सांगतले. ते म्हणाले की, ठाकरे सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना पुन्हा भरभराटीचे दिवस येतील, असा आम्हाला विश्वास वाटतो.