News Flash

आंबेडकरी जनांचा प्रवाह चालला हो चैत्यभूमीकडे!

चैत्यभूमीवर आज हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

शिवाजी पार्कवरील विविध स्टॉल्सवर शनिवारी उसळलेली गर्दी 

महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला भीमसागर उसळला; आंबेडकरी साहित्य आणि वस्तूंच्या स्टॉलवर गर्दी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येपासूनच (शनिवार) दादर येथील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात आंबेडकरी जनांचा महासागर उसळला. डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई व परिसरासह संपूर्ण राज्यातून लाखो अनुयायी दादरमध्ये दाखल झाले आहेत. शनिवारी दुपारपासूनच दादर पश्चिमेकडे ‘आंबेडकरी जनांचा प्रवाह चालला हो चैत्यभूमीकडे’ असे चित्र पाहायला मिळाले.

राज्याच्या विविध भागांतून दादरच्या चैत्यभूमीवर येण्यासाठी शनिवारी सकाळपासून आंबेडकरी अनुयायी यायला सुरुवात झाली. दुपारनंतर गर्दीचा ओघ वाढला आणि सायंकाळी उशिरा या गर्दीवर कळस चढला. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने येणारी लाखो लोकांची गर्दी विचारात घेऊन पालिका प्रशासन आणि पोलीस यांनी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे चोख व्यवस्था आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

सेनापती बापट यांचा पुतळा असलेला परिसर ते शिवाजी पार्क, चैत्यभूमी या ठिकाणी पदपथावरच आंबेडकरी साहित्य आणि वस्तूंची विक्री सुरू होती.  आंबेडकरी जनांच्या निवासाची व्यवस्था शिवाजी पार्कमध्ये करण्यात आली आहे.

औरंगाबाद येथून आलेला विशाल साबळे आणि त्याचे मित्र येथे भेटले. औरंगाबाद येथे रिक्षाची बॉडी तयार करणाऱ्या एका कंपनीत विशाल व त्याचे मित्र नोकरी करतात. ते दरवर्षी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येतात. आंबेडकरी जनतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य खूप मोठे आहे. त्या महापुरुषाला अभिवादन करण्यासाठी आम्ही दरवर्षी येतो, असे विशाल व त्याच्या मित्रांनी सांगितले. दरवर्षी लाखोंच्या संख्येत चैत्यभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी जनांची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया म्हणता येईल.

चैत्यभूमीवर आज हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी (६ डिसेंबर) रोजी महाराष्ट्र शासनाकडून चैत्यभूमी स्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार असून शासकीय मानवंदनाही देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने दिली आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2015 2:15 am

Web Title: ambedkar flowers way to chaityabhumi
Next Stories
1 विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांच्या मौनाने
2 विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून नारायण राणेंची स्वपक्षीयांवरच आगपाखड
3 अयोध्येत राममंदिर उभारल्यास मोदींच्या लोकप्रियतेला चार चाँद- शिवसेना
Just Now!
X