महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आणि प्रसद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्वीट्समुळे कायम चर्चेचा विषय ठरले आहेत. कधी ते थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारणा करतात, तर कधी त्यांचेच आभार देखील मानतात. उद्योग विश्वासोबतच समाजात घडणाऱ्या घडामोडींवर ते कायम आपल्या ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होत असताता. देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं असताना वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी या सर्वांनी करोनाच्या सुरुवातीच्या दिवसांप्रमाणेच आजही आपल्या जिवावर उदार होऊन रुग्णसेवा सुरू ठेवली आहे. त्यावर आता आनंद महिंद्रा यांनी शायरीच्या माध्यमातून ट्विट करत या आरोग्य क्षेत्रातील योद्ध्यांना सलाम ठोकला आहे.

आनंद महिंद्रा म्हणतात…!

मंगळवारी दुपारी आनंद महिंद्रांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हे ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी एक शेर देशातल्या लाखो आरोग्य सेवकांसाठी लिहिला आहे. “वो कोई और चिराग होते है जो हवाओं से बुझ जाते हैं…. हमने तो जलने का हुनर भी तूफानों से सीखा है…” असं ट्वीट Anand Mahindra यांनी केलं आहे. त्यासोबतच खाली “अथकपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या आपल्या फ्रंटलाईन हिरोंचे आभार आणि कौतुक!”, असं देखील त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

सोमवारी मुंबईत करोना रुग्णवाढीच्या प्रमाणात घट दिसून आली होती. त्यावरून आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करून अशाच प्रकारे मुंबईत रुग्णसंख्येत घट होण्यासाठी प्रार्थना केली होती.

 

याआधी देखील आनंद महिंद्रा यांनी केलेले ट्वीट विशेष चर्चेत राहिले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करण्याआधी आनंद महिंद्रा यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच परखड बोल सुनावले होते. “उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”, असं ट्वीट त्यांनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी निर्बंध लादल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार देखी मानले होते.

anand mahindra tweet
आनंद महिंद्रा यांनी लॉकडाऊनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना परखड बोल सुनावले.

वाचा सविस्तर – “उद्धवजी, समस्या ही आहे की…”, Lockdown वरून आनंद महिंद्रांचे मुख्यमंत्र्यांना परखड बोल!

मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरचा देखील एक व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी मध्यंतरी ट्विट केला होता. “हे पाहिल्यावर मी तरी कधीच मास्क विसरणार नाही”, असं त्या ट्वीटमध्ये महिंद्रा म्हणाले होते.

 

वाचा सविस्तर – आनंद महिंद्रांनी शेअर केला मरीन ड्राइव्हवरील ‘तो’ व्हिडीओ

आनंद महिंद्रा यांच्या ट्वीटर अकाऊंटचे आत्तापर्यंत ८४ लाख फॉलोअर्स झाले असून त्यांचे ट्विट्स नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय ठरत असतात.