पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोटाबंदीचा मार्ग सुचविणाऱ्या अर्थक्रांतीचे संस्थापक अनिल बोकील यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबाजवणीबाबत बोकील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त ‘मुंबई मिरर’ या दैनिकात प्रकाशित झाले आहे. बोकील यांनी ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत सरकारने मी केलेल्या निवडक सूचनाच अंमलात आणल्याचे म्हटले. यासाठी अनिल बोकील मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनादेखील भेटणार होते. मात्र, पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना अजूनपर्यंत भेटीची वेळ देण्यात आलेली नाही.

बोकील यांच्या दाव्यानुसार, त्यांनी जुलै महिन्यात नोटाबंदीच्या निर्णयाची कशाप्रकारे अंमलबजावणी केली जावी, याची सविस्तर योजना मांडली होती. मात्र, सरकारने माझ्या प्रस्तावातील पाच मुद्द्यांपैकी केवळ दोनच गोष्टी उचलल्या. त्यामुळे आता ही योजना धडपणे राबवता येत नसल्याचे बोकील यांनी सांगितले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण होणारा गोंधळ टाळण्यासाठी आमच्या संस्थेने सरकारला व्यवस्थितपणे धोरण आखून दिले होते. याशिवाय, आमच्या योजनेत थेट आणि अप्रत्यक्ष कराबरोबर केंद्रीय कर रद्द करणे, बँक व्यवहारांवरील कर, पैसे काढण्यावर कोणताही कर नसणे, आर्थिक व्यवहारांवर कायदेशीर मर्यादा आणि मोठ्या रक्कमेच्या चलन रद्द करणे अशा मुद्द्यांचा समावेश होता. आमची संस्था गेली १६ वर्षे या योजनेवर काम करत होती. या काळात आम्ही या निर्णयाचा कोणालाही त्रास होणार नाही, याचा सारासार विचार केला असल्याचे बोकील यांनी सांगितले.

हा प्रस्ताव जशाच्या तसा स्वीकारला असता तर देशात व्यवस्था परिवर्तन झाले असते. पण सरकारने गुंगीचे औषध देण्याआधीच रूग्णाचे ऑपरेशन केले, त्यामुळे रूग्णाला प्राण गमवावा लागला, अशी टिप्पणीही त्यांनी केली. आमच्या प्रस्तावानुसार या निर्णयाची अंमलबजावणी झाली असती तर केवळ काळा पैसा, दहशतवाद आणि खंडणीखोरीसारख्या प्रकारांवर परिणाम झाला असता असा दावाही बोकील यांनी केला. याशिवाय, आपण दोन हजाराच्या नव्या नोटा परत घेण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.