गेल्या चार महिन्यांपासून शहापूर तालुक्यातील चिल्हारवाडी आणि परिसरात जनावरे मृत होण्याची शृंखला सुरुच असून आतापर्यंत पर्यंत तब्बल ५०० जनावरे विषबाधेने दगावली आहेत.
सरकारकडे मागणी करुनही अद्याप या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नसून जिवंत असलेले पशुधन वाचविण्यातही अधिकारी हतबल झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. जनावरे वाचविण्यासाठी एकाच ठिकाणी चारापाणी आणि औषधोपचार देण्यासाठी चिल्हारवाडीत तातडीने सोय करावी अशी मागणी आमदार दौलत दरोडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
आमदार दौलत दरोडा, सभापती अश्विनी वारघडे, प्रकाश वेखंडे पंचायत समिती सदस्य बारकु वाघ आणि पशुधन विकास अधिकारी ए. पी. पाटील यांनी संयुक्तपणे या परिसरात भेट दिली. जनावरे चरण्यास गेल्यानंतर ते खात असलेल्या चाऱ्यामध्ये अन्य मृत जनावरांची हाडे चघळण्यात येतात. त्यामुळे जनावरांमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी होऊन ऑक्झलेट विषबाधेने त्यांचा मृत्यू होतो अशी माहिती, डॉ. पाटील यांनी दिली. सध्या पाच जनावरांच्या मृतदेहाचे नमुने मुंबईच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. या सर्व प्रकारामूळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सरकार या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.