मुंबईकरांना ‘बेस्ट’ कडून भाडेकपातीच्या निर्णयानंतर आणखी एक आनंदाची बातमी देण्यात येत आहे. तब्बल ४०० मिनी एसी बस बेस्टच्यात ताफ्यात दाखल होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचा धकाधकीचा बेस्टचा प्रवास अल्हाददायक होणार असल्याची शक्यता आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

बेस्टकडून या अगोदर बसच्या किमान भाडे दरात कपात करून ते पाच रूपये केले होते. त्यानंतर आता या वातानुकुलीत ४०० बसेसच्या बातमीमुळे बेस्टला अच्छे दिन येणार असल्याचे दिसत आहे. या ४०० बसेस बेस्ट भाडेतत्वावर घेणार असुन याबाबत या अगोदरच प्रस्ताव मांडण्यात आला होता. बेस्ट प्रशासनानं आज त्याला अधिकृतरित्या मंजुरी दिली आहे. या बसेस बेस्ट प्रशासनाच्या स्वतःच्या नाही मात्र त्या भाडे तत्वावर चालवायला दिल्या जाणार आहेत. सध्या बेस्टच्या ताफ्यात ३३०० बसेस आहेत तर येत्या डिसेंबरपर्यंत बेस्टकडे आणखी ३२०० बस येणार आहेत. महापालिका बेस्टला तब्बल ६०० कोटींच अनुदान देणार आहे. यातील पहिला १०० कोटींचा हप्ता बेस्टकडे देण्यातही आला आहे. बेस्टला दिवसाकाठी ३ कोटींचं उत्पन्न होत असल तरी येणारा खर्च दुप्पट म्हणजे साधारण ६ कोटी आहे. वर्षभरात बेस्टचा तोटा साधारण ९०० कोटींच्या घरात जातो. शिवाय अडीच हजार कोटींचे कर्ज देखील बेस्टवर आहे. त्यामुळे आर्थिक संकटातून स्वतःला सोडवण्यासाठी बेस्टनं घेतलेला भाडेकपातीचा निर्णय धाडसीच म्हणावा लागेल.