मुंबईत माणूस कधीपासून राहू लागला, या प्रश्नाचे उत्तर ब्रिटिश अधिकारी के. आर. यू. टॉड यांनी केलेल्या संशोधनाने सापडले. कांदिवलीतील टेकडीच्या भागात टोड यांनी केलेल्या संशोधनात त्यांना अश्मयुगीन हत्यारांचे अवशेष सापडले. त्यावरून मुंबईत दहा लक्ष वर्षांपूर्वीदेखील माणसाचे वास्तव्य होते, हे दिसून येते.

आधुनिक मुंबईची पायाभरणी करण्याचा निर्णय १९व्या शतकाच्या मध्यावर झाल्यानंतर तीन टप्प्यांमध्ये हे रेक्लमेशन पार पडले. त्यातील तिसऱ्या टप्प्यामध्ये कुलाबा बॅक बे म्हणजे विद्यमान मरिन ड्राइव्ह परिसरामध्ये भरणीचे काम सुरू होते. त्या वेळेस तिथे उपस्थित असलेल्या लेफ्टनंट कमांडर के. आर. यू टॉड यांना असे लक्षात आले की, भरणीसाठी आणलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये अश्मयुगीन हत्यारांचा समावेश आहे. म्हणून त्यांनी तिथे अधीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या ई. डब्लू. पेरी यांच्याकडे विचारणा केली. वरळी आणि कांदिवली अशा दोन ठिकाणांवरून या भरणीसाठी माती आणण्यात आली होती, असे लक्षात आले. त्यातही ब्रिटिश मंडळी ही दस्तावेजीकरणात मातबर असल्याने प्रस्तुत अधिकाऱ्याने ‘ती’ ढिगारा असलेली माती कांदिवलीहून आणल्याच्या नोंदी दाखविल्या. त्यानंतर दोघांनीही थेट कांदिवली पूर्वेहून माती आणलेले ठिकाण गाठले. हे ठिकाण तत्कालीन पडण टेकडीच्या मागच्या बाजूस पोयसर नदीच्या काठावर होते. या परिसरात टॉड यांना अश्मयुगातील मुंबईनिवासी माणसाचे अनेकानेक पुरावे सापडले. या पुराव्यांवरून असे लक्षात आले की, पूर्वपूर्वअश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग या तिन्ही कालखंडांमध्ये या मुंबईच्या भूभागावर खासकरून साष्टी बेटांवर मानवी अस्तित्व होते.

Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

सध्या या टेकडीच्या कांदिवली पूर्वेकडील बाजूस आपल्याला स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे संकुल आणि वडारपाडय़ाचा भाग पाहायला मिळतो. याच परिसरात जुने आकुर्ली गाव वसलेले होते. मात्र १९व्या शतकाच्या उत्तरार्धात हे ठिकाण सोडून गावकरी निघून गेल्याच्या नोंदी सापडतात.

अगदी अलीकडे ‘नेचर’ या विख्यात वैज्ञानिक संशोधन मासिकामध्ये विख्यात पुरातत्त्वज्ञ डॉ. शांती पप्पू यांचा शोधप्रबंध प्रकाशित झाला असून आता या अश्मयुगीन कालखंडांचा नव्याने रचनाक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार पूर्वपूर्वअश्मयुग हे १५ लाख ते तीन लाख वर्षेपूर्व, मध्याश्मयुग तीन लाखपूर्व आणि नवाश्मयुग हे भारतापुरते बोलायचे झाल्यास ३० हजार वर्षे पूर्वीपर्यंत असे निश्चित करण्यात आले आहे. मुंबईमध्ये या तिन्ही कालखंडातील अश्महत्यारे कांदिवली येथे सापडली आहेत. प्रामुख्याने ही हत्यारे अँश्युलीअन आहेत. विद्यमान मानवाचा पूर्वज असलेल्या होमो इरेक्ट्सच्या कालखंडामध्ये म्हणजेच सुमारे १७ लाख वर्षांपूर्वी असा हा अँश्युलीअन कालखंड निश्चित करण्यात आला आहे. या कालखंडातील हातकुऱ्हाड ही अंडाकृती किंवा पेराच्या फळाप्रमाणे असायची. भारतातील सर्वाधिक प्राचीन अश्महत्यार अतिरमपक्कमचे असून ते १७ लाख वर्षे जुने आहे. अलीकडेच मुंबईत पार पडलेल्या ‘इंडिया अ‍ॅण्ड वर्ल्ड’ या प्रदर्शनामध्ये ते प्रदर्शित करण्यात आले होते. मुंबईत सापडलेल्या हत्यारांपैकी काही हत्यारे ही अशी अँश्युलीअन कालखंडातील (साधारण दहा लाख वर्षांपूर्वीची) आहेत.

या हत्यारांमध्ये हात कुऱ्हाड, ज्या दगडापासून हत्यार करण्यात आले त्याचा मूळ गाभा, वस्तरा, तासणी किंवा रापी, परशु, तोडहत्यार, लंबगोलाकृती पाते, नासिकाकृती तासणी, एका बाजूनेच केवळ तासता येईल अशी तासणी, छिन्नी, टोच्या किंवा वेधणी, चंद्रकोरीच्या आकाराचे पाते, चंचुमुखी अवजार आदींचा समावेश होता. ही हत्यारे जमिनीच्या विविध थरांमध्ये सापडली. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे घोडय़ाचाही पूर्वज असलेल्या, साधारणपणे त्याच्याच सारख्या दिसणाऱ्या आणि आता ऱ्हास झालेल्या इक्वस नोमॅडिकस या प्राण्याचा दातही इथेच सापडला. अशा प्राण्याच्या दाताचे आणि हाडांचे अवशेष नर्मदेच्या खोऱ्यामध्ये पुरातत्त्वज्ञांना सापडले आहेत. मुंबईमध्ये कांदिवलीत त्याचा दात सापडावा, हे म्हणूनच विशेष.

याशिवाय एका विशिष्ट प्रकारच्या शिंपल्याचे अस्तित्वही इथे मोठय़ा प्रमाणावर वेगवेगळ्या थरांमध्ये आढळून आले. कांदिवलीबरोबरच बोरिवली, मार्वे, मढ, वांद्रे- पाली हिल, मालाड, गोरेगाव या ठिकाणीही अश्महत्यारे सापडल्याची नोंद टॉड यांनी केली आहे. याशिवाय दोन आणखी महत्त्वाच्या नोंदी टॉड यांनी करून ठेवल्या आहेत. कांदिवलीलाच त्यांना या ठिकाणी काही मृदभांडय़ांचे अवशेषही सापडले. त्याची रेखाटने उपलब्ध आहेत. ही तुलनेने कमी जाडीची मात्र व्यवस्थित भाजलेली अशी मृद्भांडी होती. टॉड यांनी ती नवाश्म युगातील भांडी असावीत, असा अंदाज यामध्ये व्यक्त केला आहे. याशिवाय या मृद्भांडय़ांबरोबरच साधारणपणे दोन फूट रुंदीच्या चुली सापडल्याची नोंदही त्यांनी करून ठेवली आहे. अशा प्रकारे मुंबईतील अर्थात साष्टी बेटावरील प्राचीन मानवी अस्तित्वाच्या नोंदीला सुरुवात झाली ती कांदिवलीपासून!

विनायक परब @vinayakparab

vinayak.parab@expressindia.com