संदीप आचार्य

मुंबईत करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आणि त्यांच्या सुश्रुषेसाठी परिचारिका पुरेशा संख्येने मिळत नसल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने ३५० प्रशिक्षणार्थी परिचारिकांना करोना रुग्णांच्या सुश्रुषेसाठी नियुक्त करण्याचा आदेश जारी केला आहेत.

सध्याच्या परिस्थितीत किती परिचारिकांची आवश्यकता आहे, याची माहिती पालिका प्रशासनाने घेतली असताना परिचारिकांची तब्बल ४३२ पदे भरण्यात आलेली नसल्याचे आढळून आले. तसेच अनेक परिचारिका करोना रुग्णांसाठीच्या विशेष रुग्णालयांत काम करण्यास तयार नाहीत. तसेच पन्नास वर्षांवरील परिचारिकांना शक्यतो अशा ठिकाणी पाठवू नये, असे धोरण प्रशासनाने निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या परिचारिका विद्यालयातील तिसऱ्या वर्षांला शिकणाऱ्या ३५० विद्यार्थी परिचारिकांना करोना रुग्णसेवेसाठी नियुक्त करण्याचे आदेश पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांनी जारी केले. त्यापैकी सुमारे दीडशे परिचारिकांना सेव्हन हिल रुग्णालयात कामासाठी पाठविण्यात आले आहे.  आम्हाला पुरेसे करोना संरक्षक पोशाख मिळत नसल्याची तक्रार यातील काही प्रशिक्षणार्थीनी ‘क्लिनिकल नर्सिग रिसर्च सोसायटी’च्या अध्यक्षा डॉ. स्वाती राणे यांच्याकडे केली असून आपण याबाबत प्रशासनाकडे तक्रार केल्याचे डॉ. राणे यांनी सांगितले. या प्रशिक्षणार्थी परिचारिकांचे प्रमाणपत्र अजून मिळाले नसताना त्यांना कोणत्या नियमाखाली थेट करोना रुग्णांसाठीच्या रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली, असाही सवाल त्यांनी केला. या प्रशिक्षणार्थी परिचारिका व त्यांचे कुटुंब मानसिक तणावाखाली असून त्यांना केवळ शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. हा तर उघड अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता व सेव्हन हिल रुग्णालयाची जबाबदारी पाहात असलेले डॉ. मोहन जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, यातील ७० हून अधिक परिचारिकांची राहण्याची व्यवस्था ‘रेनेसन्स’ या पंचतारांकित हॉटेलात तर अन्य प्रशिक्षणार्थीची व्यवस्थाही पंचतारांकित हॉटेलात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रशिक्षणार्थी परिचारिकांची उत्तम काळजी घेतली जात असल्याचे डॉ. जोशी म्हणाले.

या प्रशिक्षणार्थी परिचारिकांना करोना संरक्षक पोशाख मिळत नसतील तर त्याची तात्काळ व्यवस्था केली जाईल तसेच त्यांना अधिकचे मानधन देण्याबाबतही प्रशासन निर्णय घेईल. करोनाशी लढणाऱ्या आमच्या आरोग्य व्यवस्थेतील सर्वाची योग्य काळजी आम्ही घेत आहोत. काही प्रश्न नक्कीच आहेत. परंतु ते सोडवले जातील.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त