दहशतवादविरोधी पथकाच्या तपासातून बाब उघड; एटीएसची जालन्यात चौकशी

अटकेत असलेल्या कट्टरवाद्यांनी कर्नाटकातून शस्त्रसाठा मिळवला आणि त्याचा साठा महाराष्ट्रात विविध ठिकाणी दडवून ठेवला, अशी माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) मिळाली आहे. पथकाकडून या माहितीची शहानिशा सुरू असून त्यासाठी पत्रकार गौरी लंगेश हत्येच्या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकासोबत समन्वय साधला जात असल्याची माहिती मिळते. एटीएसने नालासोपाऱ्यासह राज्याच्या अन्य भागांतून मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटके हस्तगत केली.

अटकेत असलेला आरोपी वैभव राऊत याचे नालासोपारा येथील घर आणि गोदामातून २० जिवंत गावठी बॉम्ब, जिवंत काडतुसे, पिस्तूल, एअर गन असा शस्त्रसाठा हस्तगत केला. या शस्त्रसाठय़ाचा मुख्य स्रोत कर्नाटक असल्याची माहिती पुढे आली आहे. पत्रकार गौरी लंकेश हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीने बेळगावच्या खानापूर तालुक्यातील चिकले गावात छापा घातला.

या गावातील जंगलात लंकेश हत्येतील आरोपींनी शस्त्र प्रशिक्षण घेतल्याची माहिती एसआयटीला मिळाली होती. तसेच या गावातील रिसॉर्टवर आरोपींचा तळ होता. तेथेच लंकेश यांच्या हत्येचा कट आखला गेला, असा संशयही एसआयटीला आहे. रिसॉर्टचालक अटकेत असून त्याच्याकडे महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या आरोपींबाबत चौकशी सुरू असल्याचे समजते. हा छापा एटीएसच्या कारवाईनंतर घालण्यात आला.

शस्त्रांचा प्रवास..

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शस्त्रसाठा आणि शस्त्र प्रशिक्षणासाठी कट्टरवाद्यांचे कर्नाटक हे प्रमुख ठाणे होते. अटकेत असलेल्या आरोपींना कर्नाटकमधूनच शस्त्रसाठा मिळाला होता. तो टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात आणण्यात आला. पुढे तो विविध ठिकाणी दडवून ठेवण्यात आला.

नवे काय?

रविवारी एटीएसने जालना येथील रेवगाव येथील एका फार्म हाऊसवर छापा घातला. २२ एकर भूखंडावरील शेती आणि मधोमध असलेल्या एकमजली घरात वैभव राऊत, शरद कळसकर, श्रीकांत पांगरकर, सुधन्वा गोंधळेकर यांनी आश्रय घेतला आणि त्याच परिसरात शस्त्र प्रशिक्षण घेतले. तसेच शस्त्र चालविण्याचा सराव केला. याच ठिकाणी आरोपींनी बॉम्ब तयार करण्याचाही सराव केल्याचा संशय एटीएसला आहे. फार्म हाऊसचा मालक भारतीय जनता पक्षाचा माजी नगरसेवक होता. सध्या तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, अशी माहिती मिळते. सध्या या व्यक्तीकडे एटीएसचे औरंगाबाद पथक चौकशी करीत आहे.