मुंबई : वास्तुसजावटकार अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याच्या तसेच पुढील सगळ्या प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या तातडीच्या मागणीसाठी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली.

याप्रकरणी आपल्याला बेकायदा आणि सूडबुद्धीने अटक करण्यात आल्याचा पुनरुच्चार करतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिकार नसतानाही केवळ आपली छळवणूक करण्याच्या उद्देशाने प्रकरणाच्या फेरतपासाचा आदेश दिला, असा आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकरणाचा तपास सीबीआय वा स्वतंत्र तपास यंत्रणेकडे सोपवण्याची मागणीही गुरुवारी केलेल्या अर्जात त्यांनी केली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण २०१८ मध्ये बंद करण्याबाबतचा अहवाल पोलिसांनी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. परंतु या प्रकरणाचा फेरतपास करण्याचे आदेश राज्य सरकारने मे महिन्यात दिले. वैयक्तिक द्वेषापोटी फेरतपासाचे आदेश देण्यात आले, असे अर्णब यांनी म्हटले आहे.

आपल्याला सुधारित याचिका करण्याची आणि त्यात गृह विभागाच्या फेरतपासाच्या आदेशाला आव्हान देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अर्णब यांनी केली आहे.