23 July 2018

News Flash

नगरपालिकांची सत्ता कोणाकडे?

राज्यात चार टप्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत.

आज मतमोजणी; १६४ नगरपालिकांसाठी सरासरी ६७ टक्के मतदान

राज्यातील २५ जिल्ह्य़ांमधील १६४ नगरपालिका- नगरपंचायतीमधील १५ हजारहून अधिक उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा आज, सोमवारी फैसला होणार आहे. या नगरपालिकांसाठी रविवारी वादावादीचे किरकोळ प्रकार वगळता शांततेत सरासरी ६७ टक्के मतदान झाले असून थेट नगराध्यक्षांची निवड प्रथमच होत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल जनमताचा कौल काय आहे याचेही प्रत्यंतर निकालातून दिसणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे जीव टांगणीला लागले आहेत.

राज्यात चार टप्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्यात पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाणा, वर्धा व चंद्रपूर या २५ जिल्ह्य़ांतील १४७ नगरपरिषदा आणि १८ नगरपंचायतींसाठी शनिवारी मतदान झाले. सांगली जिल्ह्य़ात तासगाव येथे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी, उस्मानाबादमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली बाचाबाची, अंमळनेरमध्ये आमदार शिरीष चौधरी यांनी जिल्हा बँकेच्या संचालकास केलेली मारहाण तसेच कराडमध्ये राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याशी केलेली आरेरावी अशा काही घटनांचा अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. मतदारांनी थेट नगराध्यक्षपदासाठी एक हजार तसेच १६४ नगरपालिकामधील १५ हजाराहून अधिक उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद केले असून सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल.

सत्तांतरानंतर एवढय़ा मोठय़ा संख्येने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याची सत्ताधारी भाजप व शिवसेनेवर ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळेच राज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थामधूनही दोन्ही काँग्रेसला हद्दपार करण्याच्या इराद्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी गेले काही दिवस प्रचारसभांचा धडाका लावला होता. तर निदान स्थानिक संस्थांमधील आपले राजकीय वर्चस्व टिकविण्यासाठी दोन्ही काँग्रेसने आपली ताकद पणास लावली आहे. त्यामुळे मतदारांनी आपले मत कोणाच्या पारडय़ात टाकले आहे याचा उलगडा सोमवारी होईल.

First Published on November 28, 2016 4:26 am

Web Title: around 67 per cent polling in maharashtra municipal council polls