विनायक परब

चौल

भारताच्या गेल्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये आपली पश्चिमी किनारपट्टी खूपच महत्त्वाची ठरली आहे. त्याचे संदर्भ केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही पाहायला मिळतात. मात्र त्याचा आजवर पद्धतशीर अभ्यास झालेला नाही, असे लक्षात आल्यानंतर पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठाने विश्वास गोगटे यांच्या नेतृत्वाखाली चौलच्या उत्खननास हात घातला. २००२ ते २००६ या कालखंडात हे उत्खनन पार पडले. सुरुवातीस गवेषणामध्येच लक्षात आले होते की, प्राचीन कालखंडातील बंदराची जागा ही आता खूप आतमध्ये गेली असून वर्षांनुवर्षे वाढत गेलेल्या गाळामुळे आता किनारपट्टी खूपच पुढे आली आहे. मागच्या बाजूस डोंगराजवळ आता शेती आणि माडापोफळीच्या बागा उभ्या राहिलेल्या होत्या. चार वेगवेगळ्या ठिकाणी एकूण सात उत्खनने करण्यात आली.

डेक्कनचे डॉ. श्रीकांत प्रधान कोकणात फिरत होते. त्यावेळेस चौलमध्ये गावकऱ्यांशी बोलताना अनंत पाटील यांच्या शेतात खापर सापडतात, असा संदर्भ आला. तिथून या प्रकल्पाला मोठी चालना मिळाली. पहिले उत्खनन इथे झाले. नंतर कातकर आळी, आगरी वस्ती खाडीच्या लगत कुंडलिकाकाठी निझामशाहीच्या वास्तूशेजारी आणि मग हमामखान्यासमोर शेतात अशा उत्खननाच्या जागा निवडण्यात आल्या.

पाटील यांच्या शेतात उत्खननामध्ये प्राचीन विहिरीचेही अवशेष सापडले. एकाच उत्खननामध्ये बाजूबाजूला दोन प्राचीन विहिरी सापडल्या. रिगवेल पद्धतीचे बांधकाम असलेल्या अशा विहिरी यापूर्वी नेवासा, भोन, संजान या प्राचीन स्थळांवरही सापडल्या आहेत. अशा प्रकारचे बांधकाम इसवीसन पूर्व दुसऱ्या तिसऱ्या शतकात चौलमध्येही झाल्याचा हा थेट पुरावाच होता. पुरातत्त्वज्ञांच्या मते अशा प्रकारच्या विहिरींच्या बांधकामांची रचना मेसापोटामिया येथे सुरू झाली आणि तिथून व्यापारी मार्गाने ती सर्वत्र पसरत गेली. त्या सुरुवातीच्या ठिकाणांमध्ये चौलचा समावेश होता. इसवीसन पूर्व कालखंडातील हा पुरावा त्यामुळेच चौलचे प्राचीनत्व नेमके सिद्ध करतो. या विहिरींचे नेमके प्रयोजन काय, असा प्रश्नही सुरुवातीच्या कालखंडात संशोधकांना पडला होता. सांडपाणी टाकण्यासाठी त्याचा वापर होत असावा, असा कयास होता. मात्र चौलच्या विहिरी या पिण्याच्या पाण्यासाठीच होत्या असे संशोधनाअंती लक्षात आले.

कातकर आळीमध्ये अप्पा पाटील यांच्या जागेमध्ये मोठीच्या मोठी विटांची भिंत सापडली. उत्खननामध्ये सापडलेला हा सर्वात महत्त्वाचा भाग होता. उत्खननामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात मातीच्या वरच्या थरामध्ये चिनी आणि इस्लामिक ग्लेज्डवेअर खापरे सापडली. असे सांगून उत्खननामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे डेक्कन अभिमत विद्यापीठातील पुरातत्त्वज्ञ डॉ. अभिजित दांडेकर त्याबाबत सांगतात, इथे सापडलेली प्राचीन धक्क्य़ाची भिंत ही आडव्या आकाराच्या फारशी जाडी नसलेल्या विटांनी बांधकाम केलेली होती. साधारणपणे आजच्या कुंडलिका नदीपासून एक किलमीटर अंतर आतमध्ये हा प्राचीन धक्का होता. मात्र तिथे खूप मोठे उत्खनन करणे शक्य नव्हते. हा सातवाहनकालीन इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकातील बंदराचा धक्का असावा, असा निष्कर्ष उपलब्ध पुराव्यांवरून काढण्यात आला. याशिवाय चौलच्या सर्वच उत्खननांमध्ये आढळलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे साधारणपणे इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकापासून ते अगदी १७ व्या शतकापर्यंत सर्व टप्प्यांवरील विविध कालखंडातील खापरे, भांडी, त्यांचे अवशेष, नाणी आदी बाबी सलग सापडलेले असे हे भारतातील एकमेव उत्खनन आहे. याशिवाय इंडो-रोमन व्यापाराचे निदर्शक असलेल्या अनेक गोष्टी मोठय़ा प्रमाणावर सापडल्या. महत्त्वाचे म्हणजे इथे एका लहान मुलीला महाभोज राजाचे एक नाणेही या उत्खननापूर्वीच सापडले होते. याशिवाय चौथ्या-पाचव्या शतकातील राजादित्य याचे नाणेही सापडले. या काही दुर्मीळ म्हणाव्या अशा गोष्टी होत्या.

याशिवाय खापरांच्या संदर्भात बोलायचे तर इथे खूप मोठे भांडारच संशोधकांना सापडले, त्यात ससानियन- इस्लामिक टरकॉइज्ड ग्लेज्डवेअर, मातीवर नक्षीकाम केलेली भांडी, एगशेल वेअर, रेड स्लिप्डिपक वेअर, मोनोक्रोम वेअर, पोर्सेलिन आदी अनेक प्रकारची खापरे सापडली. त्या त्या कालखंडात विशिष्ट प्रकारची भांडी जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वापरली गेली. व्यापारी मार्गावर वापरल्या जाणाऱ्या या सर्व भांडय़ांचे अवशेष वेगवेगळ्या थरांमध्ये कालखंडानुसार सापडत गेले. त्यामुळे कोणत्या कालखंडात चौलचा व्यापार कोणत्या देशाशी होता, याची जुळणी करणे संशोधकांना सोपे गेले.

यातील एक महत्त्वाचा शोध तर या सर्वावर कडी करणारा असाच होता, तो काचेच्या अतिसूक्ष्म मण्यांचा. चौलमध्ये असलेल्या मध्ययुगीन हमामखान्याच्या परिसरामध्ये केलेल्या उत्खननामध्ये अतिसूक्ष्म आकाराचे काचेचे मणी आणि त्याच्या संबंधित अनेक गोष्टी सापडल्या. अशा प्रकारच्या मण्यांच्या उत्पादनासाठी त्यावेळेस चौल जगभरात प्रसिद्ध होते. अशाच प्रकारे चौलमध्ये उत्पादन झालेले मणी आजवर जगभरात अनेक व्यापारी बंदरांवर उत्खनन करताना संशोधकांना सापडले आहेत. यामध्ये पूर्व आफ्रिका आणि आग्नेय आशियातील अनेक देशांमध्ये असलेल्या प्राचीन बंदरांचा समावेश होतो. त्याच्या नोंदीही व्यापाऱ्यांच्या लिखाणामध्ये वेळोवेळी सापडल्या आहेत. या मण्यांचा एक साठाच या उत्खननामध्ये सापडल्याची माहिती डॉ. अभिजित दांडेकर देतात. ते सांगतात, आजवर केवळ माहिती होती, त्याचा सपशेल पुरावाच हाती लागणे थेट महत्त्वाचे होते. त्यासाठी वापरलेल्या कच्च्या मालाचा लगदाही हाती लागला. या सर्व पुराव्यांची नंतर शास्त्रीय पद्धतीने प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली, त्यावेळेस सर्व ठिकाणी जगभरात सापडलेल्या चौलच्या मण्यांशी संदर्भ जुळत गेले. चौलच्या या उत्खननामध्ये विश्वास गोगटे यांच्याच बरोबर डॉ. दांडेकर, श्रीकांत प्रधान, सचिन जोशी, शिवेंद्र काडगावकर, रुक्साना नानजी आदी सहभागी झाले होते.

उत्खननामध्ये लक्षात आलेली महत्त्वाची बाब म्हणजे इसवीसन पूर्व कालखंड ते थेट १७ वे शतक असे सलग पुरातत्त्वीय पुरावे मिळालेले हे पश्चिम किनारपट्टीवरील एकमेव ठिकाण. मुंबई बंदर म्हणून उदयास येईपर्यंत चौलचे महत्त्व कायम होते. त्यानंतर ते हळूहळू कमी होत गेले. असे असले तरी आता चौलचा परिसर आधुनिक महामुंबईनेही आपल्या कवेत घेतलेला असून इंडो-पॅसिफिक प्रांतावर आपली मोहोर उमटवणाऱ्या चौलचे महत्त्व इतिहासात यापूर्वीच अजरामर झाले आहे.

vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab